६ आजोबा
"मी अगदी मजेत आहे. मी आनंद लुटतो आहे” थोडा वेळ थांबून
ते परत म्हणाले, "मी आयुष्यातला आनंद लुटतो आहे?”
कोणी तरी आजोबांची मुलाखत घ्यायला आले होते व आजोबा
आपल्या नेहमीच्या स्पष्ट, खणखणीत आवाजात बोलत होते. आतल्या
खोलीत मला सर्व मुलाखत ऐकू येत होती.
आजोबा म्हणजे मामंजी. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रसंग फारसा
येतच नाही. आला तरी हाक मारायचा येत नाही. मी घरात आल्यापासून
जाऊबाईंची मुले त्यांना आजोबा म्हणत. मीही तोच शब्द उपयोगिते. आज
तीस वर्षांवर मी त्यांच्या घरी आहे; निदान पंधरा वर्षे तरी ते सर्वस्वी
माझ्या घरी राहतात; तरी त्यांच्या मनाचा ठाव काही मला घेता आला
नाही. त्यांचे बोलणे किंवा त्यांची एखादी कृती अजूनही मला आश्चर्याचा
धक्का देतात.
आताच पाहा ना. किती मनापासून ते सांगत होते की मी आनंद
लुटतोय म्हणून! आणि मी आश्चर्याने ऐकत होते. माझे वय आहे बावन्न,
आजोबा आहेत शंभरीच्या घरात. माझे आयुष्य दुःखात गेले असेही नाही;
पण ‘आनंद लुटणं' मला ह्यापुढे अशक्य वाटते. आयुष्याच्या वाटेकडे
पाहायला लागले तर मध्ये मोठमोठाले पांढरे दगड आहेत, काही आनंदाच्या
स्मृती आहेत, तर जवळजवळ तितक्याच दुःखाच्या घटना आहेत. किती
तरी प्रेमाची माणसे नाहीशी झाली आहेत. त्यांच्या आठवणीने मी रोज अश्रू
गाळीत आहे असे नव्हे; पण त्या अनुभवामुळे आज आनंद लुटणे मला
अशक्य झाले आहे. ‘वेणीसंहार’ नाटकात एके ठिकाणी उद्भार आहेतः