पान:Bhovara-Iravati Karve.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ । भोवरा

हृदयाची एक एक खिडकी उघडी होत होती. द्रौपदी पडली, भीमाचे रांगडे प्रेमळ मन कळवळले. नकुल, सहदेव, अर्जुन प्रत्येकाबद्दल एक एक बोचक वाक्य बोलून थोरला भाऊ पुढे चालला होता; पण द्रौपदीच्या वेळेला त्या मनातली खरी तळमळ, आयुष्यभर पचवलेले विष बाहेर पडले. "द्रौपदीनं इतरांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम केलं म्हणून ती वाटेतच पडली’ उत्तर वरवर दिसायला किती सरळ, पण त्यात धर्माच्या आयुष्यातील अगतिकता आली. हा युधिष्ठिर कोणती युद्धे खेळला होता? कोणतीही नाही. ह्या धर्मराजाने कोणता धर्म पाळला होता? अर्जुनाने पांडवांसाठी द्रौपदी मिळवली; एवढेच नव्हे तर असहाय, राज्यातून वनवासी झालेल्या पांडवांना बलशाली पांचालांचे साहाय्य मिळवले व पर्यायाने हस्तिनापूरच्या राज्याचे वारस केले. सर्व पृथ्वी जिंकली. खांडववन जाळून इंद्रप्रस्थ स्थापले. युधिष्ठिराने-धर्मानेविनासायास मिळालेले राज्य व बायको पणाला लावली. त्या मानी राजकन्येची भरसभेत विटंबना होऊ दिली. तिला वनवास भोगावयास लावला. जयद्रथाच्या वासनेला तिचा बळी जायचा; पण तिला अर्जुनाने वाचवले. तिला विराटाच्या नीचकुलोत्पन्न राणीची बटीक केले. निरनिराळ्या निमित्ताने तिला अर्जुनापासून दूर केले. पहिल्याने एकांतवासाचा भंग झाल्याचे निमित्त करून अर्जुनाला तीर्थयात्रेस पाठवले. मग पाच वर्षे अस्त्रप्राप्तीसाठी पाठवले. जेव्हा तिने हट्टच घेतला तेव्हा स्वारी त्याच्या भेटीस निघाली. धर्म राज्यावर बसला पण ते राज्य व त्याची राणी अर्जुनाच्या शौर्याने त्याला मिळाली होती. स्वयंवरात अर्जुनाने तिला जिंकले होते- तिचे मन जिंकले होते. ती अर्जुनाच्या शौर्याचे प्रतीक होती, तशीच धर्माच्या व्यसनाधीनतेची, परपुष्टतेची, असहायपणाची, अतीव वैफल्याची, मूर्तिमंत सदैव डोळ्यांपुढे नाचणारी, हृदयाला जाळणारी आठवण होती. धर्माने आपल्या वाक्याने द्रौपदीचा दोष म्हणून सांगितला तो त्याच्याच आत्म्याचे उघडेवाघडे प्रदर्शन होते... युधिष्ठिर धर्माच्या भूमिकेत आपण सर्वच वावरत असतो. मला नाही का वाटत की मी आयुष्याच्या युद्धात स्थिर व अविचल राहिले म्हणून? मला नाही का वाटत की मी आयुष्यात धर्माने वागले म्हणून? महाभारताच्या वरील कथेत स्वतःच्या आत्म्याचे दर्शन घडत असते, पण ते आपले नव्हे म्हणून बिचाऱ्या धर्मराज युधिष्ठिराची कीव करीत, कवीची प्रशंसा करीत उघडलेल्या खिडकीतील मंद झुळूक अंगावर घेत रसिकपणाचा आव आणीत ही कथा मी मोठ्या आवडीने वाचते.