पान:Bhovara-Iravati Karve.pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभोवरा / ५३

मेले म्हणून त्या रडत, ते मनुष्य पुढे आणून उभे केले की काही वेळ स्वस्थ असत. परत आपल्या थोड्या वेळाने रडायला सुरुवात करायच्या. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुष्कळ दुःखे भोगली पण सर्व निःशब्द, मुकाट्याने. पण आजारपणाच्या भ्रमातील ह्या खोट्या दुःखांना वाचा होती. त्या मोठमोठ्याने आक्रोश करायच्या. लहान मूल जसे धाय मोकलून रडते तशा रडायच्या.
 सारखे अंथरुणाला खिळलेले, सर्व व्यवहार परस्वाधीन, दिवसाकाठी काही तास मर्मांतिक वेदना सहन करता करता जागरूकपणी मन मृत्यू मागे, पण ते मन निजले म्हणजे जिवाची तडफडत का होईना, जगण्यासाठी सनातन धडपड चालू राही. आपल्याला मागितलेला मृत्यू दुसऱ्याला बहाल करून जीव दुसऱ्यांना दाखवी की मला दुःख होत आहे. पण जीवाचे खरे दुःख स्वतःबद्दलचेच होते. मृत्यूच्या दाट अंधारात भ्यालेला जीव आक्रोश करीत होता. स्वतःच स्वतःला फसवीत होता. “मी नाही मेलो, हा मेला-ती मेली-मी जिवंत आहे. मी त्यांच्यासाठी रडतो आहे."
 कवीला द्रष्टा का म्हणतात? तो मुखवट्यांच्या आड पाहू शकतो. अगदी अंधारात दडवलेले त्याला दिसते. आपण वाङ्मय का वाचतो? त्याबद्दल इतकी आवड का वाटते? माणसाच्या रोजच्या मुखवट्याआड दडलेल्या भावना इच्छा, धडपड त्यात व्यक्त होतात म्हणून. पुस्तकातील काल्पनिक व्यक्तीच्या अंतःकरणाचा तो आविष्कार असतो. पदोपदी त्यात आपली स्वतःची ओळख स्वतःला पटत असते. पण आपली स्थिती त्या भ्रम झालेल्या बाईसारखी असते. सतत बंद केलेल्या आत्म्याच्या खिडक्या उघडतात. थोडे वारे, थोडे ऊन आत शिरते, मन मोकळे झाल्यासारखे वाटते, मुखवटे फाटतात, सत्यदर्शन होते. दडपलेले भारावलेले मन हलके होते. पण हे सर्व होत असता माझे स्वतःचे दर्शन मला होते आहे, ही जाणीव नसते. दुसऱ्या कोणाचे तरी अंतरंग आपण पाहतो असे वाटते, त्यावर आपण अगदी आडपडदा न ठेवता वादविवाद करतो, हसतो, रडतो, कीव करतो-पण ती स्वतःची, हे आपल्याला समजत नाही.
 पाच पांडव द्रौपदीबरोबर महापंथाने निघाले होते. म्हातारपणाने. वाटेच्या श्रमाने एक एक मधेच थकून पडे; व उरलेले पुढे चालू लागत. मेलेला शेवटपर्यंत न जाता मध्येच का पडला, म्हणून भीम विचारी व धर्मराज यधिष्ठिर त्याला उत्तर देई. उत्तराच्या ह्या एकेका वाक्याने धर्मांच्या