पान:Bhovara-Iravati Karve.pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२ / भोवरा

की काय, तिने वर मान करून माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे टपोरे काळभोर होते. पण त्यात मला कसलीच भावना दिसली नाही. त्यांत दुःख नव्हते, सूडाचे समाधान नव्हते, गोंधळ नव्हता- अगदी काही काही नव्हते. क्षणभरच तिने माझ्याकडे पाहिले व नंतर नजर खाली वळवली. ती नजर मला निरागसही म्हणवेना, अगदी काहीच त्या दृष्टिक्षेपात नव्हते. काही तऱ्हेच्या काचा अशा असतात की बाहेरून आत प्रकाश येतो पण आतले काही बाहेर दिसत नाही. तसे होते तिचे डोळे. तिचा चेहराही अगदी स्तब्ध, निर्विकार होता. आसपास बाया फुसफुसत होत्या, थोरली बहीण मधूनमधून तिला काही म्हणत होती, पण त्याची तिला जाणीवच नव्हतीसे वाटले. चेहरा बोलतो म्हणतात-पण मला तिच्या डोळ्यांची व चेहऱ्याची भाषा कळत नव्हती. काही खिडक्या उघडल्या होत्या. पण अंतरंगातली खोली मला अंधारानेच भरलेली दिसली.
 ह्या बाया काही माझ्या ओळखीच्या नव्हत्या. त्यांचे अंतरंग मला कळले नाही, तर नवल कसले? पण अगदी दाट ओळखीचे माणूससुद्धा आपल्या माहितीचे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल. माणूस निरनिराळे मुखवटे घालून निरनिराळ्या भूमिका वठवीत असतो. नाटक म्हणून नव्हे अगदी अंतःकरणापासून प्रत्येक जण स्वतःचे म्हणून एक प्रतीक मनाशी बाळगून असते. इतरांनाही त्या प्रतीकाची प्रचीती यावी अशी धडपड असते. बरीचजणे त्या प्रतीकाबरहुकूम तंतोतंत नाही, पण मोठ्या प्रमाणात भूमिका उठवतात. एखाद्या वेळी तळाशी गाडलेले खरे बंड करून उठते-नको त्या खोलीची खिडकी उघडते व स्वतःला व इतरांना माहीत नसलेल्या व्यक्तीचे चमत्कारिक हुरहूर लावणारे दर्शन होते.
 मला एक व्यक्ती आठवली. असा मनुष्य शोधून सापडणार नाही. त्याचा वृत्ती इतकी आनंदी व संतोषी होती की, त्या भेटल्या किंवा बोलल्या तर त्याचा आनंद दिवसेदिवस मनात राही. जन्मभर इतरांसाठी झिजल्या, मेल्या त्याहा झिजून झिजून तिळातिळाने. भेटायला गेले की म्हणत, ‘नाही ग सोसवत आता, काही तरी द्या आणि सोडवा यातून.' जणू शरीराचे दुखणे कमी नव्हते म्हणून की काय, काही महिने त्यांना मधूनमधून भ्रम होई. भ्रम झाला म्हणजे मात्र त्यांच्या अंतरंगाचे एक कल्पनातीत दर्शन होई. भ्रमात त्यांना मुलगा, नातू, सून किंवा पणतवंडे मेलेली दिसायची, कधी मुलगी मेली म्हणून रडायच्या, कधी सून, तर कधी नातवंड गेले म्हणून उरी फुटत. खूप समजूत घातली, जे मनुष्य