पान:Bhovara-Iravati Karve.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५० / भोवरा

एक मध्यम वयाची, अहेवपणाची लेणी अंगावर असलेली, भांगात शेंदूर भरलेली अशी; व दुसरी तरुण पण केस काढलेली, पांढरे वस्त्र नेसलेली, विधवा होती. कधीकधी त्या एकत्र असत. कधी ती तरुण पोर दुसऱ्या बायांत जाऊन बसे. थोरली बहीण खाऊनपिऊन सुखी होती व तिने धाकट्या बहिणीचा खर्च देऊन तिला यात्रेला बरोबर आणले होते; इतकी हकीकत मला थोरलीकडून कळली होती. यात्रा जवळजवळ संपली होती. परतणाऱ्या लोंढ्याबरोबर आम्ही पीपलकोठीला येऊन पोचलो होतो. येथून बसने प्रवास करून रेल्वेचे स्टेशन गाठायचे होते. चालणे संपले होते. एका लांबलचक छपराखाली आम्ही गटागटाने बसलो होतो. बससाठी बाऱ्या लागल्या होत्या. बंगाली बायांतील काही जणी आमच्या शेजारीच एका घोळक्यात बसल्या होत्या. काही जणी मागे राहिल्या होत्या. गरुडगंगेवर स्नान करून त्या मागून येत आहेत असे कळले. ह्या बायांना यात्रा घडवणारा बंगाली माणूस व पंड्या तिकिटाच्या खिडकीजवळ तिकिटे काढीत होते. एवढ्यात ती थोरली बहीण अडखळत धडपडत कशीबशी पाय उचलीत येताना दिसली. तिच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. ती आत आली तो तिने जमिनीवर लोळणच घेतली व मोठमोठ्याने रडावयास सुरुवात केली. तिच्या मागून तिच्या बरोबरच्या बाया आल्या त्याही डोळे पुशीतपुशीत. थोरली बहीण तोंडाने काही बोलत होती, हातवारे करीत होती, धाकट्या बहिणीकडे वळून परतपरत काही सांगत होती, व मधेच कपाळावर हात मारून रडत होती. एवढ्यात त्यांच्याबरोबरचा गृहस्थ तिकिटे घेऊन आला; त्यासरशी ती धावत गेली व त्याच्या पायांवर डोके ठेवून, त्याचे पाय धरून रडू लागली. छपरात बसलेली सर्वच माणसे अगदी घाबरून गेली. झाले तरी काय? कोणी मेले की काय? थोड्या वेळाने कळले की ह्या बाया कपड्यांच्या घडीत पैसे ठेवून आंघाळीला गेल्या, परत येतात तो त्यांचे सर्व पैसे, सुमारे सहाशे रुपये- नाहीसे झाले होते. कुठे पीपलकोठी नि कुठे कलकत्ता? पैशाशिवाय एवढा प्रवास होणार कसा? आम्ही सर्वांनी वर्गणी करून तिकिटे काढून देण्याचे ठरवले पण तो बंगाली मनुष्य म्हणाला, "तिकिटं काढली आहेत, पैशाची जरुरी नाही. काळजी करू नका तुम्ही." त्या बाईचे सांत्वन करण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्याला काडीचे यश आले नाही. इतरांचे पण पैसे गेले होते. त्या नव्हत्या का स्वस्थ ? ही तर