पान:Bhovara-Iravati Karve.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
 ५
खिडक्या

 सगळं पाणी इथून तिथून एक; पाण्याला पाणी मिळालं की मग हे एक, हे दुसरं असं कसं राहील?" एक जण ठसक्यात म्हणाली.
 काय हो वैनी, सगळे डोंगरसुद्धा एकच की. हा खंडोबाचा, हा बद्रीचा, हा केदाराचा, असं कसं म्हणायचं?" दुसरीने शंका काढली.
 “वा! वा! तुमचं आपलं काहीतरीच. डोंगराडोंगरांत अंतर असत. एक डोंगर संपतो नि...... "एवढे शब्द कानावर पडतात तो बोलणाऱ्या बाया विरुद्ध दिशेने ऐकण्याच्या टप्प्याआड निघूनसुद्धा गेल्या. मागे फिरून त्यांच्या बरोबर जावे, त्यांचे बोलणे ऐकावे व ह्या मजेदार वादाचा शेवट कसा होतो ते अनुभवावे, असे मनात आले; पण ते करणे शक्य नव्हते. आम्ही बद्रीच्या वाटेवर, तर त्या दर्शन करून परत निघालेल्या. दोघांनाही वाट काटायची घाई व दुसरे म्हणजे ओळखदेख काही नाही. त्यांचा मराठी पोषाख, हातवारे करून बोलणे ह्यांनी लांबूनच माझे कुतूहल जागृत झाले होते, त्यात त्यांचे हे बोलणे कानांवरून गेले म्हणून जास्तच जिज्ञासा वाटली पण ती पुरी करणे शक्य नव्हते. यात्रेत वारंवार असा अनुभव यायचा. यात्री रात्रंदिवस एका अरुंद रस्त्यावरून जात येत होते. कोणाची कोणास ओळख नाही; पण भेट मात्र काही क्षणांची व एकदाच, कधी परत परत मुक्कामा मुक्कामाला, कधी काही तास अशी होई. अशा भेटीत काही बोलणे होई. कधी नुसते दर्शनच आणि तेवढ्यातच फक्त बाहेरचेच दर्शन नाही तर अभावितपणे अंतरंगाचेही दर्शन होई. बहुधा हे दर्शन ओझरतेच होई. एखाद्याच्या तोंडचे एखादे वाक्य त्याच्या मनाच्या कोपऱ्यावर लहानसा किरण टाकून जाई. कधी वाटे, उगीच ह्या खिडकीत डोकावलो. कधी कधी