पान:Bhovara-Iravati Karve.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ४७

 करणबाबू पुढे सरसावून खालच्या आवाजात बोलू लागले. “शक्तिपूजक, राजा व सुवासिनी आपल्या दोन भुकुटींमध्ये सिंदूर लावतात. सांगा पाहू ह्या तिघांनीच का असं करावं?"
 मी परत मान हलवली. “शक्तिपूजक शक्तीची उपासना करतो. त्याच्या भालप्रदेशी मोठा सिंदुराचा टिळा असतो. कोणाचीही दृष्टी तिकडे गेली म्हणजे तिथेच खिळून राहाते. मग तो आपल्या डोळ्यांनी त्या माणसाचे अंतःकरण बांधून ठेवतो व त्याला वश करतो. अशा तऱ्हेने तो आपले बळी मिळवतो. राजाही शक्तिमान् असावा लागतो. त्याच्या सर्वालंकारभूषित शरीरावरून मुखावर दृष्टी गेली की दोन भुवयांतील सिंदुराच्या ठिपक्यावर ठरते व अंतःकरण त्यात गुंतून राहते. मग राजा आपल्या रहस्यभेदी डोळ्यांनी त्या व्यक्तीला वश करून टाकतो. अशा व्यक्तीला राजद्रोह करणे शक्य होत नाही. पुरुषाचे अंतःकरण भटके असते. स्त्री जेव्हा पतीला भेटते तेव्हा पती तिची हनुवटी उचलून तिच्या मुखाकडे बघतो व त्या तेजस्वी मुखात, दोन भुवयांतील रक्ताचा थेंब जणू, अशा सिंदूरतिलकाकडे त्याची दृष्टी खिळते. त्याचे भटकणारे अंतःकरण स्त्री अशा तऱ्हेने काबीज करून ठेवते आणि म्हणूनच साध्वी स्त्रिया वर मान करून परपुरुषांकडे पाहात नाहीत. आता समजले सिंदूर का लावतात ते?" मी मानेनेच होकार दिला व इतका वेळ गोष्ट ऐकण्याच्या भरात उत्सुकतेने करणबाबूंकडे लावलेली दृष्टी मुकाट्याने माझ्या पायांकडे वळवली.