पान:Bhovara-Iravati Karve.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४६ / भोवरा

जमाखर्च पाहणारेही निरनिराळ्या हुद्दयाचे. रोजचा खर्च लिहिणाऱ्या कारकुनापासून तर सर्व संस्थानाचा हिशेब पाहणारे करणांचे सम्राट अशी निरनिराळी घराणी होती. त्यांतील त्यांचे घराणे मुख्य, कोणी मंडळी आली की त्यांची मापे घ्यावी, परत बसून बोलणे सुरू करावे, असे आमचे संभाषण चालले होते.
 "तुम्ही कॉलेजात शिकवता म्हणे?" मी मानेनेच होय म्हटले. हे गृहस्थ माझ्याशी बोलताना तोंडाशी उपकरणे धरून बोलत होते. मला मागून कळले की तोंडापुढे कापड धरून बोलणे हे दरबारी पद्धतीने आदर दाखवायची रीत आहे म्हणून. पण त्या वेळेला मला हा प्रकार माहीत नसल्यामुळे मला ते भारी अवघड वाटले. मला उडिया येत नव्हते, तरी सावकाश बोलले की थोडेसे समजे. त्यांना मोकडेतोडके हिंदी येत होते; तेव्हा अर्धवट हिंदी, अर्धवट उडिया असे आमचे भाषण चालले होते. "तुम्ही विलायतेला पण गेला होता वाटतं?" मी परत मानेनेच होकार दिला. “तुम्ही पोशाखात काही फरक केलेला दिसत नाही. हातांत बांगड्या, कपाळाला मोठे कुंकू, आपल्याकडचे लुगडे वगैरे दिसते आहे." सम्राटकरण परत म्हणाले. माझी मदतनीस चेहरा गंभीर ठेवून आपल्या वहीवर रेघोट्या ओढीत होती. मी अर्थात् काहीच उत्तर दिले नाही...
 “अहो, तुम्ही मानसशास्त्र शिकला म्हणता, मग सिंदूर का लावतात ते सांगा पाहू?" थोड्या वेळाने करणराजांनी मला विचारले. “मला नाही बुवा माहीत" मी प्रांजलपणे कबुली दिली. गृहस्थ किंचित् हसले व विजयी मुद्रेने त्यांनी पुन्हा विचारले, “सिंदूर कोण कोण लावतात सांगा पाहू ? कुमारी व सधवा” मी ताबडतोब उत्तरले. “आमच्यात कुमारिका नाही सिंदूर लावीत. मी त्याबद्दल नाही विचारले. बायकांखेरीज आणखी कोण लावतात सिंदूर?" “मला नाही माहीत", मी परत माझे अज्ञान प्रकट केले. तुम्हांलाच काय, फारच थोड्यांना हे माहीत आहे. पूर्वी लोकांना माहीत होतं. पण हल्ली कुणालाच ठाऊक नाही. मी तुम्हांला सांगतो."
 मी मनात पुस्ती जोडली- “ही कथा शंभूने सत्ययुगात कैलास पर्वतावर पार्वतीला सांगितली. ती सनत्कुमाराने ऐकली. त्याच्यापासून नारदाला मिळाली. ती ह्या कलियुगात नष्ट झाली. पण आज संतुष्ट होऊन ही गुह्यतम कथा मी तुला सांगत आहे."-