पान:Bhovara-Iravati Karve.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४
कुंकवाची उठाठेव

 उमार मठाच्या प्रशस्त वाचनालयात मी सकाळपासून मापे घेत होते. खाली जगन्नाथ मंदिराच्या प्रचंड पटांगणात माणसांची सारखी ये-जा चाललेली होती. सकाळ, संध्याकाळ, रात्र-केव्हाही पाहा, चौकात माणसे नाहीत असे होत नाही. सगळ्या प्रांतांचे यात्रेकरू दिसत होते. तरी मी ऐन यात्रेच्या दिवसांत गेले नव्हते. जसा दिवसाच्या चोवीस तासांत एकही तास सुना जात नाही, तसा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांत एकही दिवस इथे यात्रेकरू नाही, असे होत नाही. माझ्या मनात आले की मी एक वर्षभर पुरीला राहिले; आणि मला रक्त दिल्याशिवाय यात्रा सफळ होणार नाही अशी कोणी यात्रेकरूंची समजूत करून दिली, तर सर्व भारताच्या रक्ताचा नमुना मला विनासायास मिळेल! खालच्या पटांगणातील सर्वच नाही पण काही काही मंडळी वर येऊन मला मापे देऊन चालली होती. त्यांना वर घेऊन यायचे काम पुरीतलीच काही विद्वान् मित्र निष्काम बुद्धीने करीत होते.
 “हे गृहस्थ श्री.... प्रसाद. येथील सामन्तकरण. " मला मदत करणाच्या शास्त्रीबोवांनी सांगितले. “सामन्तकरण नाही, सम्राटकरण-सर्व करणांचे मुख्य” त्या गृहस्थांनी शास्त्रीबोवांची चूक सुधारली. “सम्राट की सभ्रान्त?" असे पुटपुटत शास्त्रीजी खाली गेले व मी त्या गृहस्थाची मापे घेऊ लागले. त्या गृहस्थाची मापे झाल्यावर दुसरा काही उद्योग नसल्याने ते तेथेच बसले व मी काय करते ते पाहात पाहात मला त्यांनी आपल्या कुळाची हकीकत सांगितली; व माझ्या कामाबद्दल माहिती विचारली. कारण म्हणजे कायस्थ, पुरीच्या देवालयाचे पुजारी जसे निरनिराळे हुद्देवाले, तसेच