पान:Bhovara-Iravati Karve.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ४३

म्हटले, "बाबूजी, त्यांना पण घरी जायचं आहे.” “उद्धट लेकाचा!" घड्याळवाला आपल्याशीच पण लोकांना ऐकू येईल असे पुटपुटला. एक क्षणभर तिकिटांच्या पानांची चवड हातांत धरून कंडक्टरने वर पाहिले– परत भोके पाडण्याचा चिमटा हाती घेतला व तो खाली पाहून तिकिटे फाडू लागला.
 त्याच्या डाव्या हातात वीतभर लांब व चार बोटे रुंद अशी निळ्यापांढ-या रेघांची सुती कापडाची पिशवी होती. तिचे बंद आंगठा व शेजारचे बोट ह्यात ताणून धरून, तोंड उघडे राहील अशी ती धरली होती. उरलेल्या तीन बोटात नोटांच्या घड्या उभ्या घट्ट दाबून धरल्या होत्या. कुणी नोट दिली की तो तिची उभी घडी करून त्या बोटात धरी व उजवा हात पिशवीत घालून नाणी काढून मोड देई. त्याच्या तीन बोटांत नोटा तरी किती मावणार, हा प्रश्न माझ्या मनात आला, तोच त्याचे उत्तर मिळाले. मधे क्षणभर फुरसत मिळाली. तेवढ्यात त्याने बोटातल्या नोटा काढून खिशात ठेवल्या व परत आपले काम सुरू केले. बस शेवटच्या मुक्कामाला जाईपर्यंत नाण्यांच्या भाराने पिशवी फाटत कशी नाही, किंवा त्यात दुसरा कोणी पटकन हात का घालीत नाही, ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मात्र मला मिळाले नाही.
 बस सब्जी मंडीशी आली. सरकारी कचेऱ्यांजवळ लोक रांग करून उभे होते व एकएकजण आत चढला होता; इथे रांग वगैरे करण्याची बात नव्हती. गाडी थांबल्याबरोबर वीस पंचवीसजण धावत दाराशी आले. चौघे-पाचजण आत शिरल्यावर जागा भरली व कंडक्टरने दाराला आडवा हात लावून आता जागा नाही म्हणून सांगितले. काहींनी आर्जवे केली, काहींनी शिव्या दिल्या. एक वयस्क लठ्ठ बाई एक पोर बखोटीला मारून सर्वांना बाजूला सारीत दाराशी आली व कंडक्टरला बाजूला सारून आत शिरू लागली. बाहेरून एकच गिल्ला झाला. “ही कोण मागून येऊन आत शिरणार? तिला बरा आत येऊ देतोस? आम्ही काय म्हणून बाहेर राहाणार?" लोकांची दाराशी झिम्मड झाली. तेवढ्यात ही बाई पायरी चढून आली- तिने एक पाय बसच्या आत घालण्यास उचलला. “बाई, आत जागा नाही." बाईचे तोंड अखंड चालू होते. तिच्या अंगावरचे पांढरे फडके बाहेर कोणाच्या तरी पायाखाली अडकले होते ते धरून मागे वळून तिने चार सणसणीत शिव्या मोजल्या, तशी फडके मोकळे झाले पण पदर घसरून तिच्याच पायाखाली आला. कंडक्टरच्या हाताला घट्ट लोंबकळून ती चढत होती. अर्धी साडी ढुंगणाखाली घसरली होती, आतला