पान:Bhovara-Iravati Karve.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३
तितिक्षा

 "बाबूजी, बेहनजी! जरा आगे बढो-आगे बढो-" तेच तेच वाक्य तो परत परत उच्चारीत होता. पण आत शिरल्याबरोबर जरा इकडे तिकडे पाहून, जागा रिकामी आहे असे दिसताच मी दाराशेजारच्याच एका बाकावर जागा धरली व इतर बाबूजी-बेहनजींना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी केली.
 एकामागून एक माणसे भरत होती. बसायच्या जागा संपल्यावर लोकं उभे राहू लागले. पहिल्यापहिल्यानेच आत शिरलेले दोघेजण सारखे घड्याळाकडे बघत होते. शेवटी न राहवून एकजण ओरडला, “काय रे, माणसं आत येण्याचं संपणार आहे का आज?" कंडक्टरने नुसते ओरडणाऱ्याकडे पाहिले व परत दाराकडे वळून “बाबूजी, माईजी, आगे बढो' हा मंत्रोच्चार करून काही जणांना हाताने जरा पुढे रेटून, खालच्या लोकांसाठी जागा केली. रांगेतली माणसे मला वाटते पन्नास असावीत-घेतल्यावर गाडी रें रें करीत चालू लागली. दर मुक्कामाला गाडीतील एखाददुसरे माणूस उतरले तर चारपाच तरी आत चढत होती.
 दोन दिवसांच्या धो धो पावसाने हवा निवळण्याऐवजी जास्तच कुंद व दमट झाली होती. साचलेली पाण्याची डबकी, मधूनमधून वस्ती नसलेल्या भागांत साचलेले पाणी व बसमध्ये गर्दीत घामावलेली माणसे ह्या सगळ्यांमुळे काही विचित्र उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. कंडक्टर गर्दीत शिरून तिकिटे फाडीत होता. पैसे घेत होता व दर पाच मिनिटांनी मुक्काम आला की दाराशी जाऊन आतील उतारूंना उतरवीत होता व नव्यांना चढवीत होता. परत एकदा घड्याळवाला उद्धटपणे ओरडला, “काय, जागेवर पोचवण्याचा विचार आहे तुझा, का इथंच कुजवणार आहेस आज?” दाराजवळून आत परतणाऱ्या कंडक्टरने तिकिट फाडता फाडता