पान:Bhovara-Iravati Karve.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४० / भोवरा

भारताच्या हद्दीतील शेवटचे खेडे माना ह्या नावाचे लागते. तेथपर्यंत जायचा आम्ही बेत केला होता; पण माझ्या तापामुळे शक्य झाले नाही. आम्ही उभे होतो ती दरी अर्धवट काळोखात होती. पायाखालचे दिसायला लागले होते. वर नजर टाकली तर पर्वतांची बर्फाच्छादित शिखरे प्रकाशाने उजळली होती. काळेभोर, गवताची पातही नसलेले, सावलीने झाकळलेले डोंगर व त्यापलीकडे उन्हांत चमकणारी शिखरे फारच रम्य दिसत होती. अलकनंदेच्या सर्वच प्रवासात छायाप्रकाशाची ही मौज दिसावयाची. पण आज बर्फाची शिखरे बरीच असल्यामुळे छायाप्रकाशाचा विरोध विशेष उठून दिसत होता. कॅमेऱ्यात रंगीत फिल्म असल्याने ह्याही वेळी आम्हांला फोटो काढता आला नाही.
 हळूहळू आठ मैल चालत गेल्यावर माझा तापही उतरला; आवाज थोडथोडा परत आला व हुशारी वाटू लागली. परतीची वाट आम्ही झपाट्याने काटली. वाटेत महामंडलेश्वर यतींची राजविलासी यात्रा परत भेटली व ह्या मंडळींना यशस्वी रीत्या टाळता येऊन त्यांच्यापुढे राहता आले ह्याबद्दल श्रीबद्री, केदार व तुंगनाथ ह्या त्रयीचे उपकार मानून पुढे सटकलो.
 गरुडगंगेला शेवटची रात्र काढली. मोठ्या शिकस्तीने जागा मिळाली. जसजसे दिवस जात होते, तसतशी यात्रेतील प्रसन्नता कमीकमी होत होती. यात्रेची गर्दी इतकी वाढली होती, की जागा मिळायला मोठी पंचाईत पडे. रस्त्यात धुरळाही फार झाला होता. सकाळी उठून चालू लागलो तेव्हा परत एकदा हिमालयाच्या जादूने आम्हांला भारले. पहाटेच्या चांदण्यात दूर अंतरावर कामेट चमकत होता; आकाश निरभ्र, गडद, काळेनिळे होते. कितीतरी पक्षी उठून अर्धवट अंधारातच किलबिलू लागले होते. खाली अलकनंदा खळखळत होती. जड अंतःकरणाने ह्या सगळ्यांना निरोप देऊन चालू लागलो व पीपलकोठीला आलो.
 मोठ्याथोरल्या पत्र्याच्या छपरात सामान टाकून बसलो व आज पुढे जाण्याची तिकिटे मिळतील का नाही, ही विवंचना सुरू झाली. धनसिंग, वीरसिंग, चंडीप्रसाद, वन्सं व आम्ही दोघे एकत्र बसलो होतो. धनसिंग क्षणांत घरच्या गोष्टी बोले, तर क्षणांत आमची संगत सुटणार म्हणून त्याचे डोळे भरून येत. अर्ध्या अर्ध्या तासाने मोटरी येत होत्या व सुटत होत्या, त्यांचे भोंगे, उतारूची धावपळ, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा ओरडा