पान:Bhovara-Iravati Karve.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३८ / भोवरा

बद्रीपासून मैल दीड मैलावर एक घोडे मिळाले; चढ जवळजवळ संपला होता; पण तरी ते केले व मी घोड्यावर बसून विश्रांती घेऊन पुढे गेले.
 बद्रीनाथाचे देऊळ चांगले प्रशस्त असूनही गर्दीत बसले असल्याने त्याला केदाराची शोभा येत नाही. आता एक एक देवस्थान नेमलेल्या कमिटीच्या पंचांच्या ताब्यात जात आहे. देवळाची जागा बळकावून घरे व बाजार वसवलेली जमीन त्यांनी जर मोकळी केली व देवस्थाने पूर्वी होती तशी प्रशस्त अंगणात परत आणली, तर काही पंडे, बडवे, पुजारी इत्यादी देवाच्या दलालांशिवाय इतर सर्व हिंदू त्यांना दुवा देतील. काही देवळांतून दुकाने इतकी आहेत की, देऊळ उठवायचीच वेळ आली आहे! काही देवळांच्या भोप्यांनी देवळाची जमीन बळकावून सबंध भोवतालून आपले वाडे बांधले आहेत व आता या देवळात जायला मोकळा मार्गच उरलेला नाही. जायचे तर पुजाऱ्यांच्या वाड्यातूनच जावे लागते. काही देवळांत श्वासकासारी व शिलाजिताच्या जाहिराती लागल्या आहेत! हिंदूंच्या देवळाइतकी अनास्था दुसऱ्या कोणाच्याही धर्माच्या पूजास्थानांची दिसून येत नाही. बद्री, केदार व तुंगनाथ वर्षाचे आठ महिने बर्फाच्छादित असल्यामुळे ह्या देवळांची फारशी विटंबना होत नाही, हे यात्रेकरूंचे नशीब!
 वन्संनी गरम कुंडावर स्नान केले. मी अंगात ताप असल्याने फक्त हातपाय धुतले. तोच तोच संकल्प ऐकून मी कंटाळले होते. “पापोऽहम् ! पापकर्माऽहम् !” छेः, मी पापात्मा आहे हे मला पटतच नव्हते-शिवाय येथील पंड्यांचे संस्कृत उच्चार पण आपल्या कानाला कसेसेच वाटतात. शेवटी माझे ‘ग्यातं अग्यातं' पाप सर्व नाहीसे करण्याची विनंती करून आम्ही तेथून निसटलो. पूर्वी पंडे संकल्प सांगताना यात्रेकरूंकडून नाडून पैसे काढीत, आता तसे होत नाही. देऊळ दुपारचे बंद झाले होते म्हणून कशीबशी घरी येऊन पडले. पंड्या काही केल्या प्रसाद आणीना व सर्वांना भूक लागलेली; मग चंडीप्रसादाने ब्राह्मणाच्या दुकानची पुरी-भाजी आणली व ती खाऊन आम्ही परत कुडकुडत रजया पांघरून पडलो. दोन तासानी पंड्या प्रसाद घेऊन आला; बाकी कोणाला भूक नव्हती, म्हणून त्यांनी उगीच थोडा थोडा खाल्ला. मला मात्र परत सपाटून भूक लागली होती व मी वरणभात, मालपुवा वगैरे यथास्थित खाऊन घेतले व परत पडून राहिले.