पान:Bhovara-Iravati Karve.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ३७

 "अग, त्यानं यात्रेला जायच्या आधी घरचं पाहतापाहता जन्म गेला. आता मुलगेमुली मोठी झाल्यावर तो निघाला; म्हणून त्याला काळजी नाही. त्याला आपल्यासारखी घाई नव्हती सुटली” “अरे, पण आपल्यापेक्षा कितीतरी तरुण माणसं निघाली आहेत की यात्रेला !” “पण त्यांना किती यातायात पडली, तुला कुठं माहीत आहे ?"
 आणि म्हाताऱ्यासारखे मनात आले निघाले, अशी माणसे विरळा. बहुतेकांची तऱ्हा तुकारामाच्या अभंगातल्या ‘आवा चालली पंढरपुरा। वेशीपासुनी आली घरा।' अशीच.
 जोशीमठापासून दीडदोन मैल सारखी उतरण आहे. थेट नदीच्या पात्राशी पोचेपर्यंत दीडदोन हजार फूट उतरावे लागते. येथे अलकनंदा एका प्रचंड पर्वताला वळसा घालून येते व आपल्याला तिच्या काठाकाठाने जावयाचे असल्यामुळे ती करील ते आपल्याला करावे लागते. एका बाजूने खळखळत विष्णुगंगा तिला येऊन मिळते; दोन नद्या मिळतात तेथे उंच लाटा असतात. नदीचे पात्र अरुंद, उभ्या पर्वतांच्या भिंतींतून गेलेले व रस्ता खडकांतून कापून काढलेला व अरुंद असा आहे. ह्या घाटातून जाताना मधूनमधून पर्वताच्या उतरणीवर बर्फ होते व समोर, मागे, बाजूला असलेली पर्वत-शिखरे अधूनमधून दिसत होती. पर्वत कापून कापून, वळसे घेत, उड्या मारीत, प्रचंड नाद करीत नदी चालली होती. दिवस वर आला असूनही पर्वतांच्या उंचीमुळे दाट सावली होती, वर गडद निळ्या आकाशाची धांदोटी दिसत होती आणि आम्ही मजेत एकमेकांच्या संगतीने वाट काढीत होतो.
 मला थोडे पडसे झालेसे वाटत होते, आवाज बसला होता. विनायकचट्टीशी मुक्काम केला, त्या दिवशी माझा आवाज पार गेला. बोलताच येईना! दुसऱ्या दिवशी बद्रीला जायचे. सकाळी उठले तो ताप पण होता. पण मिळाल्यास घोडे करावयाचे असा बेत करून गरम कपडे घालून तसेच निघालो. नेहमीसारखे चालवत नव्हते; चढ आला की श्वासोच्छावास करणे जड जाई. घोडे काही मिळेना. हळूहळू चालत होतो. त्या दिवसाचे आठ मैल व चार हजार फुटांचा चढ व पुढच्या दोन दिवसांची परतीची चाल मी कशी केली, ह्याचेच मला आश्चर्य वाटते. हवा उत्तम होती. पुढची वाटही रानामुळे रम्य होती; पण बद्रीचा चढ खडकाळ व उभा होता.