पान:Bhovara-Iravati Karve.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ / भोवरा

का? मी म्हटलं जावं काशीला; दिल्ली, आग्रा, मथुरा बघावं व घरी यावं. मुलगे, जावई पण म्हणाले, खुशाल जा, काही काळजी करू नका. मग सामान बांधलं न बैलगाडीनं येऊन अकोल्याला रेलगाडीत बसलो. गाडी झाली लेट, भुसावळेला पोचलो तर दिल्लीची गाडी निघून गेलेली! आता काय करावं? रात्रभर फलाटावर माशा मारीत बसायचं मनास येईना. पुढचीच गाडी मुंबईची होती; मग तिच्यातच बसलो झालं !"
 ... “मग यात्रेचं काय झालं?" मी कुतूहलाने विचारले. “अहो, काशी नाही तर पंढरपूरला गेलो ! तिथून येताना शिंगणापूर, जेजुरी केली. परतताना काही मंडळी भेटली बद्रीला जाणारी. तेव्हा त्यांच्याबरोबर निघालो. आग्रा, दिल्ली मथुरा, काशी, प्रयाग करून हृषीकेशला आलो नि आजारी पडलो. ती मंडळी पुढे गेली; मी मागेच. मनात विचार केला ही काही खरी सोबत नव्हे. बरं वाटलं की एकट्यानंच पुढं जावं; पण ताप हटेना. मग पुढे न जाता घरी गेलो. घरी गेल्यावर आराम वाटला व पडूनच होतो तो एके दिवशी जावई आले. “मामा, बद्रीकेदारला जायचं आहे का ? आपल्याकडचीच दहा-पंधरा माणसं जाताहेत.' हृषीकेशहून परत आल्यापासून मला पण बघा चैन पडत नव्हतंच. लगेच जावयाबरोबर गाडी जोडून शेजारच्या गावी गेलो, तर कळलं की सगळी माणसं अकोल्याला गेली. मग तसाच अकोल्याला गेलो. लेकीनं गायगावला जाऊन बांधाबाध केली; गावकऱ्यांनी दुसरी गाडी दिली; ती जोडून ती माझं सामान घेऊन अकोल्याला आली. तिथे चौकशी करीतकरीत मंडळी उतरली होती त्या ठिकाणचा पत्ता लागला. मग जावयानं विचारलं, “मामा म्हातारे, आता ताप येऊन गेलेला, कसं व्हायचं?' सगळ्यांनी सांगितलं, ‘काळजी करू नका. दादा आमचेच आहेत, संभाळून नेऊ' मग त्या माणसांसंगं आलो. परत ताप आला नाही. आपल्या माणसांत यात्रा पण सुखाची होते आहे: देवाच्या मनात दर्शन द्यायचं आहे असं दिसतं."
 बोलताबोलता आम्ही पाताळगंगेशी पोचलो होतो. म्हाताऱ्याची माणसे तिथेच रस्त्याच्या कडेला बसली होती. त्यांच्यात म्हाताऱ्याला सोडून, रामराम करून पुढे निघालो. मी म्हटले, “दहा वर्षे बद्रीला जायचं घोकता घोकता यंदा निघायचं तर कोण जिवाचा आटापिटा! आणि हा म्हातारा पाहा. मनात आलं; निघाला यात्रेला”