पान:Bhovara-Iravati Karve.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / ३५

लाटांच्या आकाराचे किंवा छपरावर जस्ताचे पत्रे असतात. त्या आकाराचे होते. मात्र उंचवटे व खळगे उथळ होते.
 हा दगड मूळचा मातीचा गाळ समुद्राच्या व सरोवराच्या तळाशी साठल्यामुळे तयार होतो. दर ऋतूतील गाळाचा एकएक पापुद्रा म्हणता येईल. उथळ पाण्यात पाण्यावरील लाटांचे स्वरूप त्याला येते. ह्या थरांचा अग्नीशी संयोग झाला की स्लेटचा दगड होतो. स्लेटच्या दगडात पूर्वकालीन प्राण्यांचे अवशेष सापडतात; पण ह्या विभागात पुष्कळदा पाहूनसुद्धा ते सापडले नाहीत. पुढे मला कळले, की हिमालयाच्या ह्या विभागात असले अवशेष सापडत नाहीत म्हणून.
 एकंदरीने केदारच्या मानाने बद्रीची वाट रूक्ष वाटली. जंगल खात्याने चीड वृक्षाच्या राया ठिकठिकाणी लावल्या होत्या; पण त्यासुद्धा पुरेशा हिरव्यागार वाटत नव्हत्या. देखावा भव्य होता, पण रौद्र होता. अलकनंदेच्या खोऱ्यापलीकडे सर्व पर्वतांवर डोके काढून उभा असलेला कामेट पर्वत मात्र फारच सुंदर दिसे. परत येताना शुभ्र चांदण्यात किंवा अगदी पहाटे तर तो फारच रमणीय दिसे. कामेटचा एक फोटो काढला. पण सगळेच फोटो पाहिलेल्या दृश्यांच्या मानाने फिके वाटतात. स्मृती मंदावली म्हणजेच फोटोची मजा वाटते; पण स्मृती ताजी असेपर्यंत फोटोतली प्रतिकृती मनाचे समाधान करू शकत नाही, असा माझा नेहमीचा अनुभव आहे. काही देखावे मात्र प्रत्यक्षापेक्षा फोटोत चांगले दिसतात; पण हिमालयाची शोभा तशापैकी नव्हे.
 एक दिवस, मला वाटते गरुडगंगेहून निघालो त्या दिवशी, दोन वयस्क पुरुष बोलताना ऐकले. मराठी भाषण ऐकून त्यांना ठरल्याप्रमाणे विचारले, तुम्ही कुठले म्हणून. एकाने सांगितले, की मी अकोल्याजवळच्या गायगावाचा. एवढ्यात त्याला खोकल्याची उबळ आली म्हणून तो खाली बसला. आम्हीही त्याच्याजवळ बसलो व मग त्याला विश्रांती मिळाल्यावर बरोबरच चालू लागलो. म्हातारा बोलका होता. शेवटपर्यंत आमची गाठ पडत होती. त्या दिवशी त्याने आपली प्रवासाची हकीकत सांगितली, “एक महिना झाला मला घर सोडून" मी म्हटले, “काय, अकोल्याहून इथपर्यंत यायला एक महिना लागला! का यात्रा करीत करीत आलात?" थोडेसे हसून तो म्हणाला, “त्याचं असं झालं, ही फिरतीची तिकिटं निघाली नव्हती