पान:Bhovara-Iravati Karve.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३४ / भोवरा

तिला टोचतात व हैराण करतात. घारीसारख्या बलाढ्य दरोडेखोराशी यशस्वी लढाई दिल्याबद्दल मी त्या चिमुकल्या कोतवालांचे अभिनंदन करून शुभ शकुन झाला अशा आनंदात पुढे चालू लागले.
 दोन-अडीच तास चालल्यावर चमोलीला आलो. वाटेत दोनतीन देवळे होती. काही पावती फाडून देणारे व काही नुसतेच हात पसणारे भिकारी होते. त्या सर्वांच्या त्रासातून सुटका करून घेत चाललो होतो.
 ह्या वाटेवर पुढे थेट बद्रीपर्यंत अधूनमधून संगमरवराचा दगड दिसला. मोठा उंची संगमरवर नव्हता; पण पुष्कळ होता. चमोलीला लोक डोंगरातील दगड फोडून लहान लहान घरे बांधीत होते. त्यात बराचसा पांढरा, पिवळा व लालसर संगमरवर होता. पुढे बद्रीच्या वाटेवर एका अरुंद जागी माती वारंवार ढासळते म्हणून दगडाची घाटी जवळजवळ अर्धा मैल बांधलेली आहे. त्यातसुद्धा ह्याच उंची दगडाचे प्रमाण बरेच दिसले. शंकराच्या देवळाची वाट सोडून धनाढ्य विष्णुमंदिराची वाट चालू लागलो त्याचीच ही निशाणी होती.
 सुदैवाने त्याच दिवशी मोटर मिळाली आणि पीपलकोठीला पोचलो. पीपलकोठीमध्ये रणरण ऊन, वैराण प्रदेश, सर्वत्र धूळ, माणसांची वर्दळ व लाउडस्पीकरचा आवाज यांनी आम्हांला नकोसे झाले! दुपारचे दोन वाजले होते. आकाशात ढग आले होते, गडगडत होते तरी आम्ही तेथून सुटण्याकरिता तसेच पुढे निघालो. कोठेही पाणी नव्हते. रस्ता धुळीचा होता; पण सुदैवाने ढगांमुळे ऊन लागत नव्हते. दरी अरुंद व पर्वत म्हणजे हजारो फुटांचीं दगडाची भिंत उभी होती. आम्ही नदीपासून तीनचारशे फुटांपेक्षा उंचीवर चालत असूनही नदीचा खळखळाट सारखा ऐकू येत होता. नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूंना ज्वालामुखीच्या पोटात रूपांतर पावलेले थराचे दगड निरनिराळे कोन करून पर्वताच्या उतरणीवर दिसत. खालच्या जमिनीशी कोणता कोन करून डोंगर उभे होते ते दिसावे म्हणून एक फोटो घेतला; पण तो काही तितका चांगला आला नाही. दगड फोडून रस्ता काढलेला होता. हे दगड बहुतेक स्लेटचे होते व त्यांचेच पातळ चिरे इकडल्या घरांवर कौलांसारखे घालतात. ह्या दगडांत अगदी पातळ पातळ पापुद्रे एकावर एक असतात व एकदोन ठिकाणी फारच मजेदार पापुद्रे आढळले. साधारणपणे पापुद्रे सपाट होते, पण एकदोन ठिकाणी ते