पान:Bhovara-Iravati Karve.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ३३

आवाज ऐकू येण्याची इतकी सवय झाली होती, की आज अगदी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. जसजसे खाली येत होतो, तसतसा तुंगनाथाचा डोंगर जास्त उंच वाटत होता. पलीकडच्या बाजूने सातआठ हजार फूट चढून आले की तुंगनाथ पुढे चार हजार फूट उंच दिसतो. त्या बाजूने तुंगनाथावरून उतरले की माणूस थेट अडीचतीन हजार फुटांवर येऊन ठेपतो. म्हणजे तुंगनाथाची प्रचंड भिंत जवळ जवळ दहा हजार फूट डोळ्यांपुढे दिसते ! उतरून उतरून पायाचे तुकडे पडले. जरा सपाटीवर चालायला मिळाले तर किती बरे होईल, असे सारखे वाटायचे. शेवटी अगदी संध्याकाळी मंडलचट्टीशी येऊन ठेपलो. तासा दीडतासाने वन्सं पण येऊन ठेपल्या. सगळीजणे इतकी दमली होती, की जवळचे फराळाचे खाऊन, दूध पिऊन लौकरच निजलो. आम्ही पाणलोट ओलांडून अलकनंदेच्या खोऱ्यात येऊन पोचलो होतो. एक लहानशी नदी तुंगनाथ, रुद्रनाथ वगैरे पहाडांतून येऊन वाहात होती व रोजच्याप्रमाणे आमच्या यात्री जीवनाचे पार्श्वसंगीत परत ऐकायला मिळत होते.
 दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. मार्ग सोपा व रम्य होता. सगळीकडून ओढे वहात होते व त्यांच्या पाण्यावर भात व गहू लावला होता. प्रत्येक ओढ्याने मोठमोठे दगडधोंडे वाहून आणले होते. त्यांचे गडगे शेताला व शेळ्या-मेंढ्यांच्या बसायच्या जागांना घातल्यामुळे खोरे दगडाने भरलेले दिसत होते. तरी जिथे जिथे माती होती तिथे झुडपे उगवून आली होती.
 पक्षी पण खूप पाहावयास मिळाले. एक मोठी गंमत पाहिली. एका घारीच्या मागे कोतवाल पक्ष्यांचे एक जोडपे लागले होते व घार त्यांना चुकवण्याचा प्रयत्न करीत होती. दोनचारदा तरी कोतवालाने घारीला टोचले व शेवटी घार हार खाऊन पळून गेली. कोतवाल आकाराने लहान, पण मोठा धीट असतो व कावळा, घार वगैरे दरवडेखोरांवर तुटून पडतो. कावळादेखील घारीचा पाठलाग करताना आम्ही पुढे एकदा पाहिला. घारीला वरून जोराने खाली झडप घालता येते, पण चटकन् दिशा बदलून पलटी खाणे तिला जमत नाही. एकदा ती उंचावर गेली म्हणजे इतर बारक्या पक्ष्यांना तिचा पाठलाग करता येत नाही; पण ती खाली असली म्हणजे कोतवाल व कावळा तिच्या भोवती फिरतात व पटकन् वर जाऊन