पान:Bhovara-Iravati Karve.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ / भोवरा

होते ! ह्याचे आणखी कारण म्हणजे जवळजवळ सर्व वाट वळणावळणांनी गेलेली आहे. पर्वताच्या कडेने जाताना दोन पुढे आलेल्या टोकांवरचा रस्ता असा अगदी आपल्यापुढेच आहेसे दिसते- तो खरोखर तसा असतोही–पण फक्त उडता येणाऱ्या पक्ष्याला! रस्त्याच्या दोन टोकांमध्ये एखादा लहानसा ओढा वा नदी खळखळत असते व आपण उभे असतो तेथून हजार दोन हजार फूट उतरून परत तितकेच चढावे तरी लागते किंवा वरच्या वरून रस्ता असला तर डोंगर माथ्यावर असलेला एखादा लहानसा पूल ओलांडून परत पलीकडच्या बाजूला तितकेच अंतर चालावे लागते!
 दोन टोकांमधले अंतर, हे प्राण्याचा आकार व प्राण्याच्या हालचालीचा प्रकार ह्यांवरच अवलंबून असणार. डोंगराच्या दोन टोकांतले अंतर बंदुकीच्या गोळीला त्या टोकांना सांधणाच्या सरळ रेषेइतके असेल; पक्ष्याला लहान-मोठ्या वक्राकार उलट्या किंवा सुलट्या कमानीइतके असेल; तर पायी चालणाऱ्या मनुष्याला अगदी वेड्यावाकड्या खालवर गेलेल्या, भूमितीच्या कोणत्याच सुरेख आकृतीत न बसण्यासारख्या रेषेसारखे ते असते. मनुष्याच्या पायांना लहानमोठे खाचखळगे व दगडधोंड्यांचे उंचवटे सरळ ओलांडून तरी जाता येतात; पण मुंगीच्या चिमुकल्या पायांना प्रत्येक खळगा व प्रत्येक धोंडा म्हणजे एक प्रचंड दरी व प्रचंड पर्वत वाटत असेल, व आपण ज्यांना दरी व पर्वत म्हणतो त्याचा आकार बिचारीला अगम्यच असणार!
 जंगलचट्टीला पोचलो तो वन्सं पण तिथेच. त्यांना म्हणालो, “आता इथे थांबायचं नाही, पुढच्या मुक्कामाला जाऊ," व तसेच पुढे निघालो. तासाभरात मुक्कामाला आलो. वन्सं भयंकर थकल्या होत्या. लोकांना दिसायला दिसते, की माणूस छान दुसऱ्याच्या पाठीवर बसून येत आहे; पण त्या माणसाला काही फारसे सुखाचे वाटत नाही. जरा थोडी हालचाल केला की खालचा माणूस बजावीत असतो, “माताजी, निश्चळ बसा" माणसाच्या चालीने टोपली खालीवर होते, त्याने बरेचदा गचके बसतात. वरून रणरण ऊन लागते. तरुण माणसाला इतके कष्ट वाटणार नाहीत. पण त्यांना यात्रा कष्टाची झाली.
 थोडा वेळ थांबून उतरावयास सुरुवात केली. आजचा प्रवास रानातून होता. ऊन मुळीच लागत नव्हते. रोज मंदाकिनाचा खळखळ