पान:Bhovara-Iravati Karve.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ३१

स्फुरणारे आकाश झाले होते. पंड्याने परत म्हटले, “माताजी- आपली इच्छा मनातच ठेवा; मला सांगण्याची गरज नाही. मी संकल्प म्हणतो." इच्छापूर्तीचा मंत्र म्हणून त्याने सूर्याकडे उदक उडवले. “चला, आता फराळ करा, लौकर उतरायला लागा; नाहीतर मुक्कामाला पोचणार नाही,' असे म्हणून त्याने आम्हांला आपल्या घरी चालवले. आम्ही पण त्याच्या मागोमाग निःशब्द गेलो. त्याच्या अंगणात बसून एका ताटात आणलेल्या गरम पुऱ्या व भाजी खाल्ली. दक्षिणा देऊन त्याची तृप्ती केली व देवळाच्या डाव्या कडेने पलीकडच्या उतरणीला लागलो.
 वाट अरुंद आणि दगडधोंड्यांनी भरलेली होती. आलो तो चढ बरा, इतका कठीण उतार होता. इकडेतिकडे, वर, चौफेर पाहात चालणे शक्यच नव्हते. शंभर पावले चालल्यावर थांबलो, आलेल्या वाटेकडे दृष्टी टाकली व सुस्कारा टाकून, तिच्याकडे पाठ फिरवून उतरावयास आरंभ केला. निर्वृक्ष उतरण. काही हजार फूट उतरल्यावर चांगले दाट रान लागले व सूर्याचा ताप भासेनासा झाला. ह्या रानात फुले केदारच्या वाटेवरल्यासारखीच होती; मात्र एक नवा वेल दिसला क्लेमाटिसचा. बागेतल्या क्लेमाटिसच्या तिप्पट मोठे फूल होते. पण वास नव्हता. हिमालयातल्या व्हायोलेटलाही वास नव्हता. जाई, कुसरी व गुलाबांना मात्र मंद सुवास होता. तरी वास अगदी दरवळून जाईल अशी फुले मात्र दिसली नाहीत. बद्रीच्या वाटेवर तमाल आढळला, पण तोही वासाला आपल्या महाबळेश्वराच्या किंवा आणखी दक्षिणेकडील कूर्गच्या रानातील तमालपत्राइतका सुवासिक नव्हता. हिमालयातील सगळीच पाने-फुले अशी का? हा उंचीचा गुण की काय, कोण जाणे.
 उतरताना खाली जंगलचट्टी दिसली. तिथल्या माणसांचे आवाजही ऐकू येऊ लागले. संपला वाटते उतार. पण छे, अजून अर्धी वाट काटायची होती. वातावरणात धूळ अगदी नसते म्हणून व विशेषतः धुके नसले म्हणजे लांबवरचे इतके स्पष्ट दिसते, की हातावर आहे, असा भास होतो. त्याचप्रमाणे शहरी जीवनातला गोंगाट, निरनिराळे यांत्रिक आवाज मुळीच नसल्यामुळे लांबचा शब्दही स्पष्ट ऐकू येतो. ह्यामुळे हिमालयात पुष्कळदा पहाड, झाडे, माणसे दूरवर असूनही अगदी जवळ आहेत असे वाटते, चालताना वाट लांब आणि जायचे ठिकाण तर चारपाचशे फुटांवर असे