पान:Bhovara-Iravati Karve.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / २९

बाजूला पितरांची चिमुकली घरे हारीने उभी होती! कोणाकोणाची पितरे बसली होती कोण जाणे! आम्ही जिवंत माणसे ह्या मेलेल्यांच्या नगरीतील राजमार्गाने चाललो होतो. पूर्व भारतातील जंगलात राहणाऱ्या काही जमाती मृतांचे अशा तऱ्हेचे स्मारक प्रचंड शिळा उभारून करतात. अशी स्मारके करणारे लोक पूर्वी युरोपपासून भारतापर्यंत पसरलेले होते असा संशोधकांचा दावा आहे, त्यांचेच तर हे अवशेष नसतील ना? एका मराठी लोकगीतात दगडांची रास करण्याचा उल्लेख आहे- “असा पुतूर इमायनी, रची दगडाच्या टिमायनी' का रचीत होता कोण जाणे! एकदा मी जेजुरीला गेले होते. तिथे कडेपठाराच्या देवळाला जाताना वाटेत दगडांची रास आहे, त्यावर प्रत्येकाने दगड टाकायचा असतो; म्हणून मी व माझ्या बरोबरच्या बाईने दगड टाकलेले आठवतात. ह्या राशी का रचायच्या, ह्याबद्दल मात्र कोणी काही सांगितले नाही.
 रोजच्याप्रमाणे ढग यायला सुरुवात झाली. वाटेत वेळ मोडणे शक्य नाही म्हणून पितरांच्या घरांचा फोटो काढण्याचे मनात असूनही पुढे सटकलो. लौकरच देवळाजवळ पोचलो. एका पंड्याच्या अंगणात घोडी उभी राहिली. आम्ही उतरलो व पंड्याला सांगितले, की फोटो काढुन मग पुढचे बोलू. तसे त्याने फोटो काढण्यास योग्य अशा एका उंचवट्यावर आम्हांला नेले. आम्ही हिमाच्छादित रांगांपासून जरा दूरवर असलेल्या एकाकी शिखरावर उभे होतो व समोर गंगोत्रीपासून बद्रीनाथपर्यंत लांबच लांब पसरलेली पर्वतांची रांग दिसत होती. तेरा ते चौदा हजार फूट उंचीचे लांबच लांब एक पठार होते. त्यावर दाट बर्फ पडलेले होते व त्यातील घडीतून हिमनद्या वाहात होत्या. त्या खाली आल्या की काळ्याभोर दगडांतून पाण्याच्या प्रवाहरूपाने शतधारांनी वर्षत होत्या. बर्फाच्छादित पठारावर अधूनमधून उंच उन्हात चमचमणारी वीस ते बावीस हजार फुटांपर्यंत गेलेली प्रचंड शिखरे दिसत होती. केदार, चौखंबा, नीलकंठ अशी त्यांची नावे. चौखंबा हा चार शिखरे मिळून बनलेला एक हिमपर्वत आहे, एखाद्या देवळासारखा दिसतो. पांढरेशुभ्र चमकणारे हिमाच्छादित पर्वत, खालच्या कडेला भयानक, काळेभोर, गवताचे पानसुद्धा नसलेले मोठेमोठे कडे, त्याच्या खाली हिरव्या गवताने अंथरलेल्या वरच्या उतरणी, त्या खाली वृक्षराजींनी झाकून टाकलेल्या