पान:Bhovara-Iravati Karve.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२८ / भोवरा

 येथे आम्हांला हिमालयाची एक सबंध रांग पहिल्याने दिसली. सूर्य नुकताच वर आला होता. हिमाच्छादित शिखरे गुलाबी रंगली होती. हिमनद्या चमकत होत्या व साधारण बारा-चौदा हजार फुटांवर आल्या की बर्फ वितळून त्यांच्यातून हजारो ओहोळांनी पाणी खाली धावत होते. किती पाहिले तरी पुरे वाटत नव्हते ! शेवटी उशीर होईल म्हणून निघालो व एका रम्य राईतून चढणीला आरंभ केला. इतक्या उंचीवर झाडांचे शेंडे हिमाने कोळपून काळे पडतात. खाली वसंतऋतूतील हिरवी-पोपटी पालवी व वरती काळा झालेला, शेवाळलेला, वेडावाकडा वाकलेला झाडाचा शेंडा असे दृश्य दिसत होते. खालच्या हिरवळीत नाना तऱ्हेची फुले उमललेली होती; पण आज आम्ही घोड्यावर असल्यामुळे ती तोडणे शक्य नव्हते.
 हळूहळू मोठ्या पानांची झाडे जाऊन चाडसारखी सूचिपर्णी झाडे आली. चढ एवढा झाला, की घोडी दर वीस-पंचवीस पावलांनी विसावा घेण्यास थांबू लागली. अर्धी वाट चढल्यावर उतरून घोड्यांना विश्रांती दिली. झाडांचा प्रदेश संपला होता. आता फक्त हिरवे गवत व झुडुपेच होती. खालच्या उतरणीवर ऱ्होडोडेंड्रॉनचे वृक्ष होते. त्यांना फुले येऊन गेली होती व कुठे चार-दोन ताजी फुले शिल्लक राहिलेली व बाकीची सुकलेली, म्हणून आम्ही अगदी हळहळत होतो. पण येथे साडेदहा अकरा हजार फुटांवर गेलो तो ऱ्होडोडेंड्रॉनची झुडुपेच दिसली व सर्व ताज्या टवटवीत फुलांच्या गुच्छांनी भरली होती ! खाली फुलांचा रंग गडद तांबडा, तर येथे निळसर जांभळा व पांढुरका असा होता. आणखी वर गेलो तर झुडुपेही नाहीशी झाली ! काळेभोर दगड जिकडेतिकडे पसरलेले होते पोथीवासापासून तुंगनाथाला येईपर्यंतच्या चार मैलांवर दोन ऋतू व पृथ्वीवरील निरनिराळे अक्षांश ह्यांचे दर्शन पुन्हा एकदा झाले. वर प्रदेश निर्वृक्ष होता तरी निर्जल नव्हता. प्रत्येक कपारीतून खळखळ पाणी वाहात होते. काही ठिकाणी चिखल झाला होता.
 पर्वताच्या माथ्याजवळ जाऊ लागलो, तसतसे यात्रेकरू वाटेवर बसून एकावर एक दगड रचताना दिसले. येथले दगड गोटे नसून सपाट कपच्या कपच्या निघालेले असे होते. त्यातील दोन उभे करून त्यांवर तिसरा आडवा ठेवायचा, अशी लहानलहान एक किंवा दुमजली घरकुले लोक बांधीत होते. हे काय म्हणून विचारता त्यांनी सांगितले, ‘पितरांसाठी घरे !' तुंगनाथवर पितरांसाठी घर बांधावे व दान करावे असे आहे. पाहिले तो वाटेच्या दोन्ही