पान:Bhovara-Iravati Karve.pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भोवरा / २७वरून कापून काढला होता! बुटाचे बंद बरेचजण बांधीतच नसत. यात्रेला निघाले की हृषीकेशला काठ्या व बूट खरेदी करीत. त्यांतल्या बहुतेकांनी तोपर्यंत कधी बूट पायात घातलेलेच नसत व मग अशी त्रेधा होई!
 रात्री पाऊस पडत होता, थंडी पण बरीच पडली होती. आम्ही उतरलो होतो ती धर्मशाळा नेहमीप्रमाणे पडवी नसून चांगले पक्के बांधलेले लाकडी दरवाजाचे घर होते. दार घट्ट लागले तेव्हा बरी ऊब आली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो. चंडीप्रसादने सांगितलेले दोन्ही घोडेवाले आपापल्या जनावरांना घेऊन येऊन तणतणत भांडत होते. शेवटी त्यांना तसेच सोडून आम्ही दोघे झपाट्याने पुढे निघालो. त्यांच्या भांडणामुळे निघायला जवळजवळ तासभर उशीर झाला. “नाही तुंगनाथ पाहिला म्हणून काही एवढं बिघडत नाही. जे पाहिलं आहे तेसुद्धा असामान्यच नाही का?" असे मी म्हटले; पण मनातून मी फार खट्टू झाले होते, तो काहीच बोलला नाही.
 दाट रानातून मार्ग होता. पक्षी सारखे बोलत होते; पण एखादाच क्वचित दृष्टीस पडे. दोन पक्षी सारखे एकमेकांना साद देत होते. त्यांच्या बोलांवरून कोकिळेच्या जातीचे (परभृत) असावेत असे वाटले. पण प्रयत्न करूनही दृष्टीस पडेनात. सबंध रान मात्र त्यांच्या बोलांनी निनादून गेले होते. वाटेत एक पहाड़ी इसम भेटला. त्याला विचारले, “हा बोलतो आहे!तो पक्षी कोण?" त्याने जरा कान देऊन ऐकले व म्हटले, “कुणा बिचाऱ्या मेलेल्याचा आत्मा आक्रोश करतो आहे!" ही कल्पना ऐकून मी चकितच झाले. त्याला आणखी काही विचारीन तर तो कधीच झपाट्याने पुढे गेला होता! पोथीवासाभोवतालची डोंगराची साखळी आम्ही जवळजवळ ओलांडली होती तो वरून खाली रिकामे घोडे येताना दिसले. “येणार का तुंगनाथाला? काय घ्याल?” “चार रुपये” “ठीक, चला" आम्ही घोड्यावर स्वार होऊन पुढे सटकलो. आता खास तुंगनाथ भेटणार ह्या विचाराने आमची मने हिमालयापेक्षाही उंच झाली!
 काही मिनिटांतच चढ चढून वर एका पठारावर आलो. समोर तुंगनाथाचा डोंगर तीन हजार फूट उंच उभा होता. त्याच्या पायथ्याला वळसा घालन चमोलीची वाट गेली होती. वन्सं मागे होत्या. त्या त्या वाटेने जाणार होत्या. आम्ही तुंगनाथ चढून, दुसऱ्या बाजूने उतरून त्यांना मिळणार होतो. पायथ्याच्या-आम्ही उभ्या असलेल्या बाजूच्या गावाचे नाव चौपता.