पान:Bhovara-Iravati Karve.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२ / भोवरा

एके ठिकाणी सबंध घळ बर्फात बुडालेली होती व त्यातूनच वाट गेली होती. ती पंचवीस पावले बर्फातून जायला सर्वांनाच मोठी हौस वाटली. धनसिंग-वीरसिंगनी मुठीमुठी घेऊन बर्फ खाल्ले! हे बर्फ म्हणजे मोठेमोठे खडे नव्हते, तर बारीक रव्यासारखी भुकटी होती व ती चिमटीने किंवा मुठी भरून उचलता येई. मोठा चढ चढून रामवाड्याला आलो. हे ठिकाण जवळजवळ नऊ हजार फूट उंच आहे. येथे गावाबाहेरच्या डोंगरावर ठिकठिकाणी बर्फ पडले होते. थंडीही खूप होती; पण यात्रेकरू आनंदात होते. केदारनाथाचा घोष जोरात होई. जसजसे पुढे जात होतो तसतसे परतणारे लोक भेटत होते. परतताना ते बद्रीनाथाचा पण जयजयकार करीत. आम्ही केदारबाबाचेच नाव घेत असू. मौज अशी, की चालणारे लोक मोठ्या आनंदात असायचे. दमले की कडेला बसायचे, दम खायचा, गप्पा मारायच्या, भूक लागली असल्यास खायचे, येईलजाईल त्याला देवाच्या नावाची ललकारी द्यावयाची, अशी चालणाऱ्यांची रीत होती; तर मेण्यातले व कंडीतले लोक फारसे हसतमुख दिसायचे नाहीत की कधी कोणाला अभिवादन करावयाचे नाहीत. मला वाटते हिमालयाची शोभा त्या बिचाऱ्यांना फारशी दिसतच नसेल. एकदा आमच्यापुढे मेण्यात बसून एक तरुण मुलगी चालली होती व वरखाली इकडेतिकडे न पाहता सारखी पुस्तके वाचीत होती. जाताजाता पाहिले तो मराठी कादंबरी दिसली ! एकदा एक मनुष्य दिसला, त्याच्या हातात गजराचे घड्याळ होते. चट्टीवर पांचच्या पुढे निजू म्हटले तरी शक्य नसते, इतकी सर्वांची गडबड व धांदल असते; मग ह्याला गजराचे घड्याळ कशाला लागत होते कोण जाणे !
 केदारच्या वाटेवरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ह्या रस्त्यावर शेळ्यामेंढ्यांची वाहतूक कमी प्रमाणात असते. बद्रीच्या वाटेवर माणसांइतक्याच शेळ्यामेंढ्या जातात. बद्रीवरून व जोशीमठावरून दोन वाटा तिबेटात गेल्या आहेत व म्हणून भारत व तिबेटातील व्यापाऱ्यांची येजा ह्या मार्गाने अतिशय आहे. शेळ्या, मेंढ्या, घोडी व याकसारखी दिसणारी केसाळ ठेंगणी जनावरे सारखी माल वाहून नेतांना दिसतात. शेळ्या-मेंढ्या आपल्याकडील जनावरांपेक्षा दिढीने तरी उंच असतात व त्याच्या पाठीवर उजव्या-डाव्या बाजूंना पाच ते दहा शेर धान्य किंवा बटाटे भरलेल्या लोकरीच्या पिशव्या असतात. पहिल्यापहिल्याने ह्या कळपांचे