पान:Bhovara-Iravati Karve.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भोवरा / २१

नाही. उन्हाळ्यात त्या पडण्याचा फारसा संभव नसतो; पण पाऊस रोजचाच असल्यामुळे एखाद्या वेळी कडा कोसळला तर नवल नाही. इकडचे लोक हिमालयाला कच्चा पहाड म्हणतात ते यामुळेच.
 यात्रेला उन्हाळ्यात जावे का पुढे जुलै-ऑगस्टमध्ये जावे, ह्याबद्दल पुष्कळ मते ऐकली होती. एप्रिलमध्यापासून जूनमध्यापर्यंत अतिशय गर्दी होते. पुढे मुख्य यात्रा संपून निवांतपणा मिळतो. झाडांना दाट पाने येऊन सगळीकडे हिरवेचार दिसते. पण पावसामुळे वाट ठिकठिकाणी कोसळायचा संभव असतो. साधारणपणे एप्रिल बारातेराच्या सुमाराला केदारला पोचण्याचा बेत ठेवला तर गर्दी नसते. थंडी बरतीवरती बरीच लागते; पण हे दिवस ऐन वसंतऋतूचे असल्यामुळे त्याला गवतातली फुले, ऱ्होडोडेंड्रॉन वगैरे शोभा पाहावयाची त्याला उत्तम. शिवाय वसंतऋतूत पक्षी हिमालयात यावयास सुरुवात करतात. झाडांना पाने फारशी नसल्यामुळे दुर्बिणीतून ते नीट पाहता येतात. हिवाळाभर निजलेली सृष्टी वसंतात हळूहळू डोळे उघडते, ते दृश्य फार मनोवेधक असते. एकीकडे हिवाळ्याचे बर्फ पडलेले असते; तर बर्फाच्या कडेला झरणाऱ्या पाण्यातून असंख्य रानफुले उमललेली असतात. आम्हांला तरी हिमालयातील वसंतऋतू हु़द्य वाटला.
 सारखे ‘हिमालय हिमालय' म्हणते आहे; पण खरे म्हणजे आम्ही हिमालयात प्रवेश केला नाहीच. केदारनाथाशी हिमालयाच्या एका पर्वताचे जवळून दर्शन झाले. तुंगनाथावरून हिमालयाच्या रांगा दुरून पाहिल्या प्रत्यक्ष हिमालयावरील अक्षय हिमाच्छादित शिखरावर आम्ही पाऊल ठेवले नाही. आम्ही फक्त दारापर्यंत जाऊन डोकावून आलो, इतकेच. ह्या डोंगरांना शिवालकचे डोंगर म्हणतात. शिवालक म्हणजे शिवाचे केस. शिवाचे डोके कुठे उंच आकाशात असेल! पर्वताच्या ह्या लांबलांब रांगा म्हणजे जाडजाड जटा व त्या बटाबटांतून मंदाकिनी, अलकनंदा, भागीरथी वगैरे अनंत प्रवाहांनी गंगा झरत खाली येते... मला वाटते, आपले अनुभव सांगण्यासाठी तोंड उघडू नये, लेखणी हाती धरू नये. ज्यांनी हिमालयाच्या दृश्यावर भगीरथाची कथा रचली; ज्यांनी ह्या डोंगरांना शिवालक म्हटले, त्या प्रतिभासंपन्न लोकांपुढे इतर कुठलाही प्रयत्न क्षुद्रच ठरणार! जसजसे केदारच्या जवळजवळ जात होतो, तसतसा देखावा जास्तजास्त भव्य होत होता. झाडी पण दाट झाली. ठिकठिकाणी डोंगरांवरून बर्फ दिसू लागले.