पान:Bhovara-Iravati Karve.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२० / भोवरा

व्हायोलेटना तोटा नव्हता; पण फूल मोठे असूनही वास नव्हता आणि रंगानेही गडद नसून आल्प्स् पर्वतातल्या व्हायोलेटप्रमाणे निळे पांढुरके होते. ऱ्होडोडेंड्रॉनच्या वृक्षांना बहर येऊन गेला होता. सुकलेली फुले मात्र दिसत होती, म्हणून हळहळ वाटली. पण जसजसे वरती गेलो तसतसे फुलांच्या बहारातलेही वृक्ष दिसले. रोज नवे नवे पक्षी दिसत होते, शांतपणे रस्त्यावर उभे राहून दुर्बिणीने त्यांना न्याहाळता येत होते. फुले गोळा करावयाची हा तर रोजचाच उद्योग होता. ती एका लहानशा रोजनिशीत दाबून ठेवली होती व मग डेहराडूनला गेल्यावर एका वनस्पतिशास्त्रज्ञाकडून त्यांची ओळख पटवून घेतली. काही नानाफूलांचे कंद उकरून बरोबर घेतले व ते पोस्टाने पुण्यास धाडून दिले. त्यांतल्या काही वनस्पती जगल्या आहेत; पण हिमालयातल्या झाडाला पुण्यात फुले धरतीलसे वाटत नाही.
 वाट चालताना कधी परस्परांत, कधी यात्रेकरूंबरोबर संभाषण होई, तर बरेच वेळा काही न बोलताच तासन् तास चालत असू. एकदा असेच चालताना मी सहज विचारले, “समुद्राच्या तळाशी काय असतं, कधी पाहिलं आहेस?" तो फक्त हसला व त्याने भोवतालच्या देखव्याकडे हात दाखवला. आमच्या दोघांच्याही मनात तेच विचार चालले असले पाहिजेत. सध्या हिमालय आहे तेथे फारफार पूर्वी एक मोठा समुद्र होता. पृथ्वीच्या पोटात व त्यामुळे पाठीवरही भयंकर उलथापालथ होऊन समुद्राचा तळच्या तळ उचलला गेला व तो हिमालयपर्वत! हिंदुस्थानातला हा सगळ्यांत नवा पर्वत. हे बाळ अजून उंचउंच वाढत आहे! ह्या उलथापालथीच्या वेळी पोटातली आग उसळून वरती येत होती व तिचा निरनिराळ्या थरांशी संबंध येऊन निरनिराळ्या तऱ्हेचे रूपांतरित दगड बनत होते. ह्या दगडातूनच अग्निरसात भस्म झालेल्या द्रवाची राख सगळीकडे दिसून येते. हीच हिमालयातली राखट रंगची माती. ही ठिसूळ असते व पावसाळ्यात दगडांचा ढिगारा घेऊन कोसळते. असे कोसळलेले कडे ठिकठिकाणी दिसून येतात.दरवर्षी कडे कोसळल्यामुळे ठिकठिकाणी पूल व रस्ता कोसळतो व तो दर वर्षी यात्रेच्या आधी दुरुस्त करावा लागतो. काही वर्षांपूर्वी कोसळलेल्या ठिकाणातून अरुंद वाट गेलेली असते. कोसळलेला कडा एखाद्या थिजलेल्या प्रवाहासारखा दिसतो. ठिकठिकाणी प्रचंड शिळा अर्धवट खाली येऊन वरच्यावर लोंबत असतात. कधी डोक्यात पडतील ह्याचा नेम