पान:Bhovara-Iravati Karve.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / १९



केदारची रांग स्वच्छ दिसत होती. येथे जरा वेळ बसावे असे वाटत होते; पण भिकाऱ्यांमुळे तिथे उभे राहणे शक्य नव्हते. नेहमीच्या भिकाऱ्यांखेरीज पावती फाडून वर्गणी गोळा करणारेही आता भेटू लागले. ठिकठिकाणच्या प्राथमिक शाळांचे चालक वाटेतच टेबल मांडून बसत व शाळेसाठी पैसे मागत. इतक्यांना पैसे कोठून द्यावे व का द्यावे हा मोठा प्रश्न पडे. आम्ही हिशेब केला. दर वर्षी ५० हजार ते एक लाख यात्री बद्री व केदारला येतात. अगदी पन्नास हजारांचाच हिशेब धरला तरी प्रत्येक यात्रेकरू यात्रेसाठी अगदी कमीत कमी शंभर सवाशे रुपये खर्च करीत असणार. त्यातले पन्नाससाठ मजुरांचे गेले तरी निदान माणशी पन्नास रुपये या दोन अरुंद विरळ वस्तीच्या खोऱ्यात तो खर्च करतो. म्हणजे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत पंचवीस लाख रुपये येथल्या लोकांना-चट्टीवाले, दुकानदार, पंड्ये वगैरे लोकांना मिळतात. ह्या पैशांवर स्वतःच्या जिल्ह्याची स्थिती का सुधारता येऊ नये? प्रतिवर्षी एवढे उत्पन्न पाच महिन्यांत-खरोखर तीन महिन्यांतच जास्त उत्पन्न असते-मिळत असताना अशी हीनदीन भिकारी वृत्ती का? वाटेवर भेटलेल्या प्रत्येक मुलाने भीक का मागावी? महाराष्ट्राच्या मानाने ह्या लोकांचे खाणे सकस; शेती कष्टाची खरी, पण वस्ती विरळ व दर वर्षी हुकमी उत्पन्न. काहीतरी चुकते आहे! आमचा हिशेब चुकत असला पाहिजे, की हिंदू लोकांना भीक मागण्याची लाजच नाही?
 अगस्ती कुंडाजवळून दरीचा एक फोटो काढला आणि पाठीमागे लागलेल्या मुलांना चुकवीत पुढे चालू लागले. चंडीप्रसादला पकडून कॉलऱ्याची टोच दिली म्हणून पुढे एक दिवस मला सैपाक करावा लागला. यात्रा-कंपनीने ही व्यवस्था आगाऊ करून ठेवावयास पाहिजे होती.
 गाव संपल्यावर शांतपणे परत प्रवासास सुरुवात झाली. तेथून तीनचार हजार फूट चढून गुप्त काशीला जावे लागते. तेथे थांबून वन्संना दर्शन करवले व पुढे निघालो. तेथून केदारपर्यंतचा प्रवास फारच आनंदाचा झाला. रोज दुपारी पाऊस पडायचा. पायांखाली रस्ता ओलसर व थंड असे. हवेत धूळ मुळीच नाही. हिमालयाची दरी रोज नवी दृश्ये दाखवी. रोज नवीनवी फुले, वृक्ष दिसत. थोडे आम्हांला ओळखता येत. बहुसंख्य माहीत नसलेले होते. गवतावर रानटी स्ट्रॉबेरीची फुले व फळे आलेली होती.