पान:Bhovara-Iravati Karve.pdf/184

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८४ / भोवरा

फरशी, तीवर चिनीमातीची चित्रे. सगळे काही होते. फक्त आत लाकडे जळत नव्हती व धूर वरती जाण्यासाठी धुराडे म्हणून उभे केले होते त्याला वरती भोकच नव्हते. जेन ऑस्टेनच्या वेळच्या घरातील बैठकीच्या खोलीचा देखावा उभा केला होता. माझ्या थकलेल्या पापण्या जड झाल्या, पण तेवढ्यात मला दिसत होते, त्या चिटुकल्या लिहिण्याच्या टेबलावर बसून अॅन एक चिटुकली चिठ्ठी लिहीत होती. बाजूच्या छोट्याशा टेबलावरील नक्षीच्या फुलदाणीत फॅनी बागेतली गुलाबाची फुले रचीत होती. त्या मोठ्या पियानोशी कोण बरं? एलिझाबेथच ती. एवढ्या मोठ्या पियानोशी बसायचा धीर दुस-या कुणाला होणार? बरं झाल, नॉरीसबाई व बेनेटबाई इथे कटकट करायला नाही आल्या ते. ह्या पोरी असल्या तरी मला त्यांचा मुळीच त्रास होत नाही.
 किती वेळ लोटला होता कोण जाणे. मी परत डोळे उघडले तर संध्याकाळच्या सावल्या घरात शिरल्या होत्या. खोलीच्या कोप-याकोपन्यांत अंधार भरला होता. आधीच मंद रंगाच्या भिंती जवळजवळ दिसेनाशा झाल्या होत्या. खिडकीच्या तावदानातून वेलींची पाने झाडांच्या फांद्यांवर घासताना दिसत होती, पण त्यांचा आवाज आत ऐकू येत नव्हता. मा सगळीकडे नजर फिरवली. अॅन, फैनी, एलिझाबेथ सगळ्या जणी निघून गेल्या होत्या. शंभर वर्षांपूर्वीची टेबले, खुर्च्या, आगोटी पुसटपुसट दिसत होती. घरात सगळीकडे नीरव शांतता भरून राहिली होती. माझ्या शेजारी फक्त माझा कायम सांगाती बसून होता- डोळ्याची पापणी न हालवता सारखा बघत होता. “बघ, सारखा बघत राहा. मी उपभोगणारी आणि तू बघणारा.”
 मी समाधाने पुटपुटले, “मला आवडलं घर. छान आहे. मरायला छान आहे न् जगायलाही छान आहे.”

१९५९