पान:Bhovara-Iravati Karve.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १८३

 मी रागानेच म्हटले, “मेल्यावर!"
 "खरंच?" हेटाळणीचा सूर आला.
 "नाही बाबा, कधीच संपत नाही. युगानुयुगे संपत नाही बरं. पण आता आयुष्यात माझा तात्पुरता प्रवास संपला आहे... प्रवास संपला आहे."
 पडल्या पडल्या स्वस्थपणे मी खोली न्याहाळाली. सकाळी एकदा घर पाहिले होते, पण घाईत. माणसांच्या गर्दीत.. माझ्या शेजारीच मोठे काचेचे दार होते, त्यातून बाहेरची बाग दिसत होती. आमच्या लहानशा बंगलीभोवती आवार बरेच मोठे होते व त्यात खूप झाडे होती. झाडे आणि वेलींनी घर वेढले होते. वेलींचे तणावे व झाडांच्या फांद्या दरवाजापर्यंत आल्या होत्या. पडल्या पडल्या मधल्या खोलीचा कोपरा दिसत होता. त्याच्या पलीकडे जेवणघर-स्वैपाकघर व अमेरिकन घराला लागणारी सर्व यंत्रे. पाणी तापत होते, चुलीचा गॅस मंद ज्योतीने जळत होता. पदार्थ थंड होण्याच्या फडताळात पदार्थ थंड होत होते. पण ह्या यंत्राचा आवाज मात्र सुदैवाने मला ऐकू येत नव्हता, इतकी ती खोली दूर होती. जर्मनीतली एक रात्र आठवली. घर इतके लहान होते की ह्या सगळ्या यंत्रांचा आवाज आळीपाळीने रात्रभर ऐकू येत होता आणि डॉक्टर सकाळी म्हणत होते की ‘रात्रभराच्या विश्रांतीनंतरसुद्धा तुम्हांला थकवा वाटतो का', म्हणून!
 बसायच्या खोलीत मी नजर फिरवली. घर मोठे गमतीदार होते. एकतर इथल्या मानाने जुने आणि दुसरे म्हणजे जुन्या धर्तीचा माल विकणाऱ्या बाईचे होते. भिंतींचा रंग मंद होता. खालची जमीन काळसर होती. डोळ्यांना त्रास होईल असा रंग कोठेही नव्हता. शंभर दोनशे वर्षांपूर्वी ज्या तऱ्हेची खुर्च्या-टेबले लोक वापरीत, तशा सामानाने खोली सजली होती. प्रत्येक वस्तू भारी किमतीची, पण हल्लीच्या काळी मोठ्या उपयोगाची नाही अशी. एक बाजाची पायपेटी, एक पियानो. दिसायला फार सुंदर; भारी लाकडाची, गुळगुळीत पॉलिश केलेली; पण ह्यातून सर निघत नव्हते. गौरीने आल्याबरोबर वाजतात का; ते पाहिले होते. लिहायचे टेबल फार नाजूक पण फार तर एखादे पुस्तक व एखादा कागद मावेल एवढे. बहुतेक जागा लहान लहान ड्रॉवर व मोठाल्या आरशांनीच व्यापलेली. पलीकडल्या भिंतीत एक खोटी खोटी आगोटी. लोखंडी मोठी शेगडी, तिच्यासमोर मोठे नक्षीचे लोखंडी दार, आगटीवर संगमरवरी