पान:Bhovara-Iravati Karve.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
      २० 
     प्रवास संपला

 सहा महिने झाले, मन आणि शरीर इतके थकले आहे की, निजताना मी म्हणायची, “आत उठणे नको" सकाळी आपले डोळे उघडत. तीच खिडकी, तेच झाड, तीच टेकडी. “अरे, मी उठले वाटतं!" परत एक दिवस, परत रात्र आणि मग न चुकता आणखी एक दिवस. कितीदा असे चालणार आहे?
 एक एक गाव म्हणजे नव्या नव्या वेदनांची स्मृती, झूरिच, म्युनशेन. ट्युबिगेन, बॉन, आमस्टरडॅम, न्यूयॉर्क. मला वाटले होते युरोपच्या थंड हवेत बरे वाटेल. पण बरे कसले? घरी नुसता थकवा वाटत होता. आता त्याच्या जोडीला वेदना पण आल्या. सगळ्यांचा विरस. आज सॅनफ्रान्सिस्कोला पोचलो व बसत उठत कशीबशी मोटरपाशी पोचले. परत वीस मैलांचा प्रवास. एकदाचे बिऱ्हाडी आलो. एक नर्स तयारच होती. तिने काही परीक्षा केली. दुसरी नर्स आली, तिने रक्त काढले, डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली. घरमालकीण व मालक येऊन स्वागत करून गेले. दोघे प्रोफेसर आले होते. ते थोडा वेळ बसून गेले. आमचे बिऱ्हाड चालू करून देण्यासाठी एक बाई आल्या होत्या. त्यांच्याबरोबर सामान आणायला घरची मंडळी गेली. मी बसायच्या खोलीतच निजले होत. अंगावर पांघरूण होते. मंडळी जाताना काहीतरी सांगून गेलीसे वाटले, पण मला वाटते मी अर्धवट झोपेत होते.
 डोळे उघडले तो मी कुठे आहे ते कळेना. मग लक्षात आले. हळूहळू प्रवास आठवला. मोठ्या समाधानाने मी म्हटले, “संपला एकदाचा प्रवास."
 "प्रवास संपतो का कधी?"