पान:Bhovara-Iravati Karve.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / १८१

मोटरच्या सडकेला मिळायला आम्ही चाललो होतो. मला गचाळ काव्य सुचत होते व जाई मला मदत करीत होती. शेवटी एकदाच्या चार ओळी झाल्या व दिनूने लगेच डायरी काढून टिपून ठेवल्या
 सा रम्या तटिनी मरुन्मुखरितास्ते कीचका उन्नताः
 वर्षामेघनिभा गजा मदयुतातस्ते शृंखलाकर्षिणः।
 जल्पनत्या विविधाः कथा वनगृहे (अर्थात् फॉरेस्ट रेस्ट हाऊस)
  सार्ध दुहित्रा मया
 नीतो वो दिवसस्त्वया सह सखे विस्मर्यते सः कथम्।।

० ० ०


 "कशा काय झाल्या आहेत!” तो म्हणाला, “उत्तम" जाई म्हणाली, "दुसरं ग काय म्हणणार!" आम्ही सर्व हसलो. रस्त्यावर पोचलो. कडेला एक झोपडी होती. तिच्या उघड्या पडवीत मुक्काम केला. सबंध रान सुवासाने भरून राहिले होते. कूर्गभर ठिकठिकाणी हा वास येतो. फुलाला ‘कुरुंजी' म्हणतातसे वाटते. काहीतरी चमत्कारिक आवाज डोक्यावर घुमू लागला. म्हणून पाहिले तो मधमाश्यांचा मला मोठा थवाच्या थवा वरून चालला होता. पाहता पाहता तो काळा ढग गुणगुणत लांब गेला. आम्हांला सपाटून भूक लागली होती, म्हणून पोळ्यांचा डबा व मधाची बाटली काढली. कूर्गच्या मधाला तो वास येतो. अजूनही कूर्गच्या रानात दरवळणारा सुगंध, मधमाश्यांची दिवसभर चाललेली गुणगूण, मधाची कडवट गोडी व माझ्या माणसांच्या मायेची संगत ह्यांनी त्या एका दिवसाची स्मृती रसरशीत नाही, धगधगीत नाही, पण शांत आणि स्निग्ध अशी मनात भरून राहिली आहे.

 "झालं का तुझं?"
 "हो. झालं लिहून."
 "मग दे एकदाचा तो लेख संपादकांकडे पाठवून."
  “बरं."

१९५८