पान:Bhovara-Iravati Karve.pdf/180

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८० / भोवरा

कॉफीच्या मळ्यांसंबंधी व संत्र्यांच्या बागांसंबंधी असते. हे सुंदर घरातून राहतात. दर जेवणाला कोंबडी व डुकराचे मांस खातात. यथेच्छ दारू पितात व मोठमोठ्या मोटरींमधून हिंडतात. ते व त्यांच्या बायका सुस्वरूप असतात. बरेचसे लष्करात जातात व सर्वच एकंदर युरोपियनांसारखे राहतात. राजकारण, समाजकारण असल्या कटकटी त्यांना माहीत नाहीत. त्याच देशात, जंगलात लहान झोपड्यांतून बेट्टा-कुरुबा व जेनु-कुरुबा राहतात. त्यांना पण वीरराजाचे नाव माहीत नाही. ते जंगलात काम करतात. मिळेल तेव्हा मध खातात, दारू पितात, सण आला म्हणजे रात्रभर नाचतात, गातात, रामायणाचे नाट्य करतात. त्यात राम काळा चष्मा घालतो व सीता ओठ रंगवते, गोरे होण्यासाठी तोंडाला हळद फासते. ते पण कोंबड्या बाळगतात. राजकारण अजून त्यांच्यापर्यंत फारसे पोचले नाही. पण एक जेनु-कुरुबा व एक बेट्टा-कुरुबा कोडगू कौन्सिलचे मेंबर असलेले मला भेटले होते. एकजण आपले घर शाकारीत होता. दुसरा घराभोवती कळकाची वई घालीत होता.

OOO

 त्या दिवशी प्रवासातच जाई व जाईचे वडील बरोबर होते. असे प्रसंग क्वचितच येत. आता तर ते कधीच येणार नाहीत. जाई परघरी गेली आहे. तिचा जीव तिच्या माणसांभोवती घोटाळत आहे- आणि माझा पण.
 “मग सर्व सोडून जायच्या गोष्टी बोलतेस ते खोटंच ना?"
 "जे खरं नाही ते खोटं आणि खोटं नाही ते खरं, अशा दोनच टोकांत का सर्व गोष्टींची विभागणी करायची?"
 "असा दुटप्पीपणा करू नकोस. माणसानं आपल्या मनाशी तरी खरं बोलावं."
 “मी खरं तेच सांगते. पण पटवून घ्यायचं नाही त्याला काय म्हणाव माझ्या मनाच्या अडचणीचीच मला भीती वाटते म्हणून मी तोडायची भाषा बोलते"
 "उगीच काही तरी उगाळायच नाही असं ठरलं होतं ना?"
 "हो!"
 "मग पुढे चालू कर"
 सबंध सकाळ रानात घालविली होती. कळकांच्या बेटांत, हत्तींच्या कळपात कुरुबांच्या झोपड्यांत, कावेरीच्या काठावर. काम आटोपून