पान:Bhovara-Iravati Karve.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ / भोवरा

असे, कारण ह्या नद्या बऱ्याच ठिकाणी पाताळगंगा' झालेल्या आहेत. वाट चालणारा असतो नदीपासून तीन साडेतीन हजार फूट उंच. नदीचा आवाज ऐकू येतो; नदी फेसाळत जाते ते दिसत असते; पण पाणी मात्र हाताला लागत नाही! शिवाय ज्या ठिकाणी नदी जवळ असते तिथे पाणी पिण्याला योग्य नसते. उन्हाळ्यात बर्फ वितळून नद्यांतून जे पाणी वाहते ते सिमेंट कालवलेल्या पाण्यासारखे काळसर, धूसर असते. वरून डोंगरावरची राखेच्या रंगाची बारीक माती धुपून येत असते; त्यामुळे वस्त्रातून गाळूनही पाणी स्वच्छ मिळत नाही. उत्तर प्रदेश सरकारने डोंगरमाथ्यावरूनच्या स्वच्छ झऱ्यांचे पाणी ठिकठिकाणी दर दोनचार मैलांवर पिण्यासाठी बांधून आणले आहे. ह्या नळ्या रात्रंदिवस स्वच्छ पाण्याने वाहात असतात व तिथेच सर्वांची पाणी पिण्याची गर्दी उसळलेली असते. तेथे जात नाही, पात नाही, बाई नाही, पुरुष नाही, ज्याला जशी वेळ मिळेल. तसे जाऊन पाणी घ्यावे लागते.
 ह्या सगळ्या गर्दीत कुठे असभ्यपणा इतकाही आढळला नाही. एकाच ओढ्यात आंघोळ करून, भराभर वस्त्रे धुऊन वाळवायची गर्दी असे. स्त्रियांच्या पुरुषांच्या आंघोळी चालत; पण कोणी बायकांची चेष्टा केली असे आढळले नाही. स्त्रीपुरुषांचे मिश्र घोळके विश्रांतीस बसत. स्त्रिया पदर काढून मुलांना प्यायला घेत. पण येणाराजाणारा वाटसरू कधी वाकड्या नजरेने बघत नसे. बऱ्याच स्त्रिया तरुण व सौंदर्यवती होत्या; पण त्यांच्याकडे पाहून टक लावणे, फिदिफिदी हसणे किंवा अश्लील हावभाव दिसले नाहीत. तुंगनाथवर एक वयस्कर बाई अंग धुऊन विवस्त्र होऊन मुलाच्या हातून लुगडे घेत होती. मोठा समाज भोवती होता; पण कोणी ह्या गोष्टीची दखल विकृतपणे घेतली नाही. शिक्षण व सुसंस्कृतपणा ह्यांची फारकत लक्षात येऊन मन परत परत विषण्ण होई. पुण्यामध्ये कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना जी हीण वागणूक मिळते; प्रत्येक गॅदरिंग किंवा सभेच्या वेळी मुलींना उद्देशून जे अचकटविचकट शब्द व हावभाव ऐकू येतात व दिसतात, त्यांची आम्हा दोघांना आठवण होई. पण नको, हा प्रदेश त्या आठवणीने विटाळायचा, ह्या बुद्धीने आम्ही त्याबद्दल फारसे बोलायचेसुद्धा नाही, असे ठरवले; तरीही पदोपदी ह्या विरोधाची जाणीव व्हायचीच.
 आम्ही अगस्ती कुंडाजवळ पोचलो. तिथे नदीचे पात्र रुंद होते.समोर