पान:Bhovara-Iravati Karve.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / १७९

 डॉक्टरांनी एक भला मोठा उसासा टाकला व म्हणाले, “अहो, त्या हत्तींची काळजी आहे ना! एखादा हत्ती तरुणपणी आजारी पडून मेला की कौन्सिलमध्ये किती प्रश्नोत्तरे होतात; व शेवटी डॉक्टरच्या हयगयीमुळे हत्ती मेला की नाही, हे ठरविण्यास कमिशने नेमतात. हत्तीची किंमत असते दहा हजार रुपये- माझ्या सारख्या जनावरांच्या डॉक्टरला काय किंमत? ह्या एवढ्या प्रदेशात हत्ती आजारी नाही, असे सहसा होत नाही व मी कधी काळजीतून मुक्त होत नाही.”

ooo

 कूर्गमध्ये हरिजनांची एक विशिष्ट जात आहे. तिकडे गेले होते. गावापासून पाऊण मैलभर मैदानात एक स्वतंत्र वस्ती आहे. तिचे नाव नेहरूनगर. लहान लहान सुबक घरे होती. काम छान झाले. पाहुणचार पण चांगला झाला. पूर्वी हे हरिजन गावाजवळ होते. आता ते गावापासून दूर व बरेचसे स्वतंत्र झाले होते. दुसऱ्या गावी असेच गांधीनगर आहे. निवडणुका जवळ आल्या की निरनिराळे पुढारी येथे येतात. एरवी त्या वस्तीचा गावाशी संबंध नाही. शाळा स्वतंत्र, पाणोठा स्वतंत्र, देऊळ स्वतंत्र, सभागृह पण स्वतंत्र. ह्यामुळे जातिनिर्मूलन कसे होते कोण जाणे!

ooo

 तडियंडमोळो! संध्याकाळच्या गुलाबी प्रकाशात कूर्गचे सर्वांत उंच शिखर स्पष्ट दिसत होते. विराजपेटचा डाकबंगल्याचा जिना चढून धावतच मी वर गेले. मागच्या पडवीत बसले की शिखर सहज दिसायचे, ते मागच्या वेळेला मी आले होते, तेव्हा मला माहीत झाले होते. तडियंडमोळोवर चढले म्हणजे मंगलोरच्या बंदरातील गलबते दिसतात. त्याच्या भोवती रान इकडच्यापेक्षा दाट आहे. तेथल्या मळ्यांतून वेलदोडा पिकवितात. त्याच्या पायथ्याशी कूर्गच्या शेवटच्या राजाचा-वीरराजाचा-एक राजवाडा आहे. त्या राजवाड्यात वीरराजाची आई व बायका होत्या; आणि त्या एकाकी वाड्यात, दागिन्यांच्या लोभाने कुणी नोकराने त्यांचा प्राण घेतला. वीरराजाचा शेवटही फार वाईट झाला. तडियंडमोळोचे लांबून दर्शन झाले की त्या न पाहिलेल्या वाड्याभोवती, पाय न ठेवलेल्या शिखराभोवती माझे मन रेंगाळते. कुर्गचा राजा टिपूशी झगडून शेवटी इंग्रजांच्या साम्राज्यतृष्णेला बळी पडला. पण कोडगू लोकांना त्यांची आठवणही नाही. त्यांचे सर्व व्यवहार व भाषण