पान:Bhovara-Iravati Karve.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १७७

पाठी लागले म्हणून आई त्याच्यादेखतच पळून गेली होती. आई परत आली नाही म्हणून त्याने खिशात घालून पिल्लू आणले. हरीण होते बारीक हरिणाच्या जातीचे. मोठे झाले तरी ते फार तर १० इंच उंच होते. जंगल अधिकारी म्हणाला, पिल्लू दोन दिवसांत मरेल. पण आम्ही ते मागून घेतले. लहान काचेच्या नळीला रबर लावून त्यातून त्याला दूध पाजले. पुण्याला आल्यावर ते फारच माणसाळले. आम्ही त्याचे नाव होन्ने (सोनी) ठेवले. पण सर्वांना चटका लावून ते तीन महिन्यांचे होऊन गेले. त्याचे पेन्सिलीएवढ्या पायाचे खूर फरशीवर वाजायचे, त्यांचा आवाज अजून ऐकू येतो. ते नंदूच्या कुशीत शिरायचे ते आठवते. त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यातले मोठमोठे भावपूर्ण डोळे प्राण ओतून माझ्याकडे बघतातसे वाटते.
 तित्तिमट्टीचा मुक्काम आटपला. मला वाटते तित्तिमट्टीच होते ते. होन्नीला पुण्याला पाठवून मुक्काम हालवला. नीटसे आठवत नाही. किती दिवस झाले. गावाची न् माणसांची नावे स्मरत नाहीत.
 "आठवत नसेल तर लिहावंच कशाला?"
 "विचार केला की आठवेल की आणि लिहिलं की पक्कं होईल."
 "पक्कं म्हणजे काय?"
 "परत विसरलं तर लिहिलेलं असलं म्हणजे आठवण जागी होईल.”
 "पण जे विसरलं असेल ते जाणून-बुजून जागं करावंच कशाला? ते मेलं. मेलेला अवयव जिवंत शरीराला चिकटवला तर त्याचं ओझं होतं. तसंच स्मृतीचं नाही का? माणसांचे फोटो काढायचे, त्यांना विसरायचं आणि मग कधी तरी ते पाहिले म्हणजे एकमेकांना विचारायचं, 'हे कोण बरं?' तसंच तुझं चाललं आहे.”
 "ज्यांची स्मृती असेल, त्यांच्या फोटोची गरज नाही.”
 "आणि ज्यांची नाही, त्यांच्याही नाही. अनुभव जिवंत रसरशीत असला तर लिहावे; उगाच मेलेल्या मढ्यावरचे निखारे हुंकायचे कारण नाही.”
 "काय ठरलं होतं?"
 "काय?"
 "उगीच भरकटायच नाही. पुढे लिही.”
 "बरं..."
 नंदू नि मी उठून भल्या पहाटे कामाला गेलो. कमल सर्व सामान घेऊन