पान:Bhovara-Iravati Karve.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७६ / भोवरा

ये) म्हटले की ते मुलांच्या मागे जाई. मुलांनी त्याला गूळ दिला. मग तर ते इतके चिकटले, की दुपारच्या फराळासाठी आम्ही बसलो तर सरळ आत येऊन आमच्या पंक्तीला बसले! एक हत्ती नवा धरून आणलेला होता. तो सारखा आपल्या लाकडी पिंजऱ्याला धडका देत होता. कित्येक मोठे ओंडके त्याने पार मोडून टाकले होते. पण त्याच्या रागाचा सपाटा व अचाट शक्ती पाहून जिवाचा थरकाप होई. पण तितकीच त्या रागाची विफलता पाहून मनाला फार वाईट वाटले. केवढाले प्रचंड हत्ती आम्ही काम करताना पाहिले. त्यांच्या डोक्यावर एखादा बेट्टा कुरुबा बसलेला असायचा. ही माणसे इतकी लहान असत की त्यांचा उघडा हस्तिवर्णी चिमुकला देह पहिल्याप्रथम दिसतसुद्धा नसे. तो बिचारा पिंजऱ्याला धडका देणारा हत्ती काही दिवसांतच एका लहानशा प्राण्याच्या हुकमतीखाली काम करायला लागणार होता. हत्तीखान्याच्या एका कोप-यात काही आजारी हत्ती होते व एक डॉक्टर मदतनिसाच्या साहाय्याने औषधे देत होता. एका हत्तीची दाढ दुखत होती. त्याच्या किडलेल्या दातांत डॉक्टरांनी एका पिचकारीने हायड्रोजन पेरॉक्साइड घातले व त्यातून पिपेच्या पिपे फेस निघत होता. तो हत्तीच्या डोक्यात व नाकात गेला की हत्ती बेचैन होई. मुले तर आजारी हत्ती व डॉक्टर ह्यापासून दूर व्हायला तयार नव्हती. एका हत्तीला इंजेक्शन द्यावयाचे होते. हत्तीच्या कातडीतून आत पोचायला म्हणून सुई चांगलीच दणकट व जाड होती. तिसऱ्या हत्तीला एरंडेल पाजीत होते. एका मनुष्याने उंच उभे राहून हत्तीच्या तोंडात एक बांबूचे नळकांडे धरले होते. दुसरा त्यांत एरंडेल ओतीत होता. जितके ओती, त्यातील निम्मे घशात जाई व निम्मे बाहेर पडे. हत्तीला पुरस डोस जाईपर्यंत डॉक्टर व आसपासचे मदतनीस एरंडेलाने न्हाऊन निघाले! मुलांना आश्चर्य वाटले की, हत्ती सर्व उपचार होईपर्यंत स्वस्थ राहतो कसा! डॉक्टर म्हणाले, “माणसापेक्षा हत्ती किती तरी शांत व समजूतदार. मी आज पंधरा वर्षे काम करीत आहे, पण कोणत्याही हत्तीने कधी त्रास दिला नाही."
 आम्ही रात्रीचे जेवत होतो. साडेआठ वाजले असतील. आमच्याबरोबर त्या दिवशी जंगलचे एक अधिकारी होते. एक गार्ड आत आला व त्याने खिशातून काहीतरी काढून कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवले. आम्ही पाहिले तो एक वीत लांब व पाउण वीत उंच असे सोनेरी पट्टे असलेले हरणाचे पिल्लू! गार्ड म्हणाला, जंगलातल्या पायवाटेवर त्याला एकटे पिलू सापडले.जनावर