पान:Bhovara-Iravati Karve.pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १७५

घरच्यांनी ते तपासायचे, नावनिशी टिपून ठेवायची, नळ्या धुवायच्या, दुसया दिवसाची चालणाऱ्यांची तयारी ठेवायची.
 एका मुक्कामावर आम्हांला एक अगदी तरुण पोरगेलासा अधिकारी आमच्या दिमतीला मिळाला. कुठल्याही झाडाचे, वेलीचे नाव विचारले की तो चटदिशी सबंध लॅटिन नाव सांगे. आम्ही पण मोठ्या हौसेने आमची जिज्ञासा पुरी करून घेत होतो. चालता चालता एक झाड आतापर्यंत न पाहिलेले दिसले. मी विचारले “ह्याचे नाव काय".
 “त्याने झाडाची पाने पाहिली, खोड पाहिले व मान हलवून म्हणाला, “नाही बुवा माहीत, पण एस् नाहीतर टी ने सुरुवात असणार नावाची."
 मी आश्चर्याने विचारले, “अहो, ज्या झाडाचे नाव माहीत नाही त्याच्या नावाची सुरुवात तुम्हांला कशी माहीत?"
 तो मोठ्याने हसला, “अहो, मी डेहराडूनच्या कॉलेजात जाण्यासाठी अभ्यास करीत आहे." त्याने एक भला लठ्ठ इंग्रजी ग्रंथ पोतडीतून काढून माझ्यापुढे केला. “त्या बुकात भारतातील झाडांची वर्णनं अकारानुक्रमाने केली आहेत. इंग्रजी आर् पर्यंत माझी सर्व झाडे पाठ झाली आहेत म्हणून म्हटले एस नाही तर टीने सुरुवात असेल म्हणून."
 तो आम्हांला शेवटला दिसला तो एका ट्रकमध्ये. इंग्लंडमधून कोणी बडा लॉर्ड शिकारीला आला होता. त्याच्या दिमतीला त्याला दिले होते. तो लॉर्ड पुढच्या मऊ जागेवर बसला होता व हा मुलगा मागे जोडलेल्या गाड्यात. आम्हांला जंगलाच्या रस्त्यावर पाहिल्याबरोबर तो उभा राहिला. त्याच्या हातात तो लठ्ठ ग्रंथ होता. तो ग्रंथ त्याने हातात वर धरून हालवला व हसत हसत ओरडला, “मी आता एस संपवला आहे, पण ते झाड त्यात नाही.”

ooo

 एक दिवस आम्ही हत्तींच्या कॅमात पोहोचलो. तेथे बरीच माणसे, विशेषतः आदिवासी कामावर असतात व एकदम बऱ्याच जणांच्या रक्तांचे नमुने आम्हांला मिळतील ही माझी अपेक्षा होती. हत्तींच्या कॅपात गेल्यावर माझे सर्व मदतनीस पसार झाले. तेथे पाहायला इतक्या गोष्टी होत्या की मला मदत करायला कोणीच तयार नव्हते. मग मी एक दिवसाची सुटी जाहीर केली व कॅपात फिरायला गेले. माणसाळलेले हत्ती कामे करीत होते. एक पिल्लू असेल माझ्या कमरेइतके उंच-तर मुलांच्यात मिसळून गेले होते. बा, बा (ये,