पान:Bhovara-Iravati Karve.pdf/172

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
       १९
     कोडगूंच्या प्रदेशात

 एखादा लेख लिहिताना त्या लेखातील वस्तूबद्दलच लिहिले पाहिजे. लेखकाच्या सर्व वृत्ती कथावस्तूत बुडून गेल्या पाहिजेत असा एक जुना दंडक आहे. पण एखाद्या वेळी मन बंड करून उठते. मन म्हणजे एक नव्हे- अनेक- ती एकाच वेळी वावरत असतात- बहुधा त्यांतला एक 'मी' इतका जोरदार असतो की इतर मींचे अस्तित्व जाणिवेत नसते. पण काही वेळा अशा येतात, की कोणताच एक मी जोरदारपणे मनाचे अंगण व्यापू शकत नाही. अशा वेळी निरनिराळे 'मी' गर्दी करतात. ह्यांच्या भांडणाने मन त्रस्त होते. तशातच अमके एक काम अमक्या वेळात झालेच पाहिजे, असे असले म्हणजे वृत्ती अगतिक होते. अशाच एका परिस्थितीत हा लेख लिहिला. एका मनाला मी तो लेख लिहावा हे मुळीच पटत नव्हते. थोड्या रागाने, काहीशी चिडीने घालून पाडून बोलून ते मन सारखे मधेमधे तोंड घालीत होते. इतक्या आग्रही मनाची ही लुडबूड लेखातून काढून टाकली असती पण एका मनान दुसऱ्या मनाची अशी मुस्कटदाबी करणे जमेना. परत मनाच्या अंधाऱ्या खोलीत भांडणाला सुरुवात झाली आणि त्या कटकटीला कंटाळून दोन मनानी मिळून लिहिलेला हा लेख तिसऱ्याच एका मीने प्रकाशकाकडे पाठविला.

०००

 “तू लिहिणार नव्हतीस ना?"
 नव्हते."
 मग इतकी कामं टाकून का बसलीस लिहिण्याच्या थाटात? अर्धा तास झाला नुसती बसली आहेस"
 “खरंच मला ल्याहावसं वाटतच नाही."