पान:Bhovara-Iravati Karve.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७० / भोवरा

तयारी आहे. हिंदुस्थानभर ते जातातच, पण परदेशी जाण्यासाठी जिवाचा भयंकर आटापिटा करतात. दिल्लीला खोटे पासपोर्ट तयार करणारी एक टोळी नुकतीच पकडली. मला इकडच्या लोकांनी सांगितले, “एक टोळी पकडली म्हणून काय झाले? हा उद्योग काही थांबायचा नाही." मी सहा वर्षांपूर्वी सॅन्फ्रान्सिस्कोला होते, तेथे कस्टम कचेरीत तीसचाळीस पंजाब्यांचा जथ्था बसला होता-बायका-पोरे पुरुष-कोणाला म्हणून इंग्रजीचे एक अक्षर येत नव्हते. मी दिसल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला व कस्टम अधिकाऱ्यांशी त्यांचे काय काम होते, तिथून पुढे जायला त्यांना कधी मिळणार, वगैरेची चौकशी करावयास सांगितले. त्यांचे काम करून दिल्यावर मी पण त्यांना विचारले, तुम्ही इकडे कुणीकडे? मला कळले की कॅनडात काही शेकडा पंजाबी शेतकऱ्यांना गव्हाची लागवड करण्यासाठी जमिनी मिळाल्या आहेत व पंजाबी कुटुंबे कॅनडात जाऊन स्थायिक झाली आहेत. उद्या सैबेरियात वसाहत करण्यासाठी बोलावले तरी हजारोनी पंजाबी लोक जातील, ह्याबद्दल माझी खात्री आहे.
 ह्या दोन प्रदेशांतील लोकांच्या प्रत्येक आचारात फरक दूिन येतो. आधीच लंबा-चवडा असलेला पंजाबी, मोठी थोरली दाढी राखून, माठा थोरला उंच फेटा बांधून, जाडजूड अंगरखा व तुमान घालून आपल्या उंचीत व रुंदीत भर घालतो व आपल्या दांडग्या पौरुषाची जाहिरात लावतो, तर आधीच ठेंगणा व नाजूक बंगाली पुरुष तलम, झिरझिरित अंगरखा घालून पोकळ धोतर नेसून व लांब केसांचा भांग काढून आपला नाजुकपणा आणखीनच वाढवितो; पंजाबीसुद्धा आपल्या पोषाखाच्या ऐटीत असतो पण त्याची ऐट एखाद्या पोराची असते, एकदा छानछोक पोषाख झाला म्हणजे लोक आपल्याकडे पाहतात ना याबद्दल त्याला जिज्ञासा व कुतूहल असते. तो नेहमी लोकाभिमुख असतो. ह्याउलट बंगाली मनुष्य आपली बुद्धी, आपली कला, आपली संस्कृती यात बुडालेला, अंतर्मुख तर खासच नव्हे; पण आत्मसंतुष्ट असतो. मला आठवते, मी कलकत्त्याला काही कामानिमित्त गेले होते, तेथल्या एका बागेत आम्हा निमंत्रितांना चहा होता. आमच्या यजमानांपैकी एका बंगाली तरुण पुरुषाबद्दल मला जिज्ञासा वाटली. होता पोरगेलासाच, बंगाल्यांच्या मानाने उजळ, नाक-डोळे रेखीव, भव्य उंच कपाळ, मध्यम उंचीचा असा होता त्याच्या रूपापेक्षाही त्याच्या