पान:Bhovara-Iravati Karve.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / १७

वाटे, बंगाली शेजारी आले म्हणजे त्यांचे खाणेपिणे, बोलणे निराळे. ही मंडळी वाटभर फक्त भात-भाजी शिजवून खात. उत्तर प्रदेशातील लोक किंवा पंजाबी असले म्हणजे ते गव्हाचे रोट करीत. कधी भात व वरण. रोटांबरोबर नेहमी वरण असायचे. शिवाय हे लोक एकदा रोट करून ठेवीत व वेळ मिळेल तसे दुधाबरोबर खात. ओरिसाचे लोक पण भातखाऊ. उत्तर रजपुतान्यातून बरेच जाट व रजपूत आले होते; ते बहुतेक रोटच खाणारे. शिवाय मोठा मुक्काम असला म्हणजे बरेच जण पुरी, भाजी, भजी, जिलबी घेऊन खात. रोजच्या कटकटी व्हायच्या, दक्षिणेकडील लोकांच्या. देवप्रयागाला पहिले भांडण झाले. एक म्हातारा मराठा वारकरी पाण्यासाठी थांबला होता. नळावर लोकांची झिम्मड होती. मी जरा रदबदली करून त्याला नळावर जागा करून दिली. त्याने बादली लावली व कोणाचा शिंतोडा उडाला म्हणून सबंध पाणी ओतून टाकले! सगळ्यांना फार राग आला. त्यांची समजूत घालता घालता पुरेवाट! वऱ्हाडकडचे एक कोष्ट्याचे कुटुंब आले होते. तो मनुष्य म्हणे, "म्हाताऱ्या, तुला सोवळंओवळं करायचं तर आलास कशाला इकडे? घरीच का नाही बसलास?" काही हिंदीत, काही पंजाबीत, काही बंगालीत सगळेच जण म्हाताऱ्याची टिंगल करीत होते. “नारायणा, विठ्ठला! तुला नाही रे दया येत !” म्हणत, एकीकडे सर्वांना रागावत तो बाजूला उभा होता. ‘म्हाताऱ्याचा आत्मा भुकेने तळतळत नका ठेवू, घेऊ द्या त्याला पाणी" म्हणून विनंती केल्यावर सगळे दूर होऊन त्याला पाणी मिळाले, पण यात्राभर त्याला खास त्रास झाला असेल.
 अशीच एक कानडी बाई दोनतीनदा दिसली. ती अंग धुऊन धाबळी नेसून सोवळ्याने स्वयंपाकाचे पाणी नेण्यासाठी कुडकुडत उभी असायची. सगळ्यांचे आटोपले की हिला पाणी भेटायचे. ती पाणी भरायला लागली की आंचवणारे येत, मग तर तिची धांदल उडून जाई.सगळया यात्रेकरूंचे खाणे आटपून, चुली विझून भांडी घासून झाली, तरी हिचा स्वैपाक चाललेला असे! शेवटच्या शेवटच्या मुक्कामांत इतकी थंडी होती, की सगळे कपडे चढवूनही ऊब येईना. ही म्हातारी धाबळी नेसूनच पाणी भरायला येते का, ते मला पाहायचे होते; पण ती मागे राहिली होती.
  मंदाकिनी, अलकनंदा वगैरेंच्या तीराने जाऊनही पाण्याची टंचाई