पान:Bhovara-Iravati Karve.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १६९

मिळतो म्हणून अशा दैन्यात कोणीही पंजाबी राहिला नसता. पंजाबचा माणूसच काही वेगळा हे खरे; काय वाटेल ते करायचे पण या जंगलातल्या चांगल्या गोष्टी हस्तगत करायच्या हा त्याचा बाणा. सरकारचे शेतीतज्ज्ञ सांगतात की, पंजाबी शेतकरी कुठलाही नवीन प्रयोग करून पाहायला तयार असतो. नवीन खत द्या; नवीन बियाणे द्या; शेतीची नवीन अवजारे द्या, सर्व काही वापरून पाहायला त्याची तयारी असते. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात पुढे कसा जाऊ असा विचार चुकूनसुद्धा त्याच्या मनात येत नाही, ती सगळ्यांना कोपरखळ्या मारीत धडाक्याने पुढे सरकतो. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादा त्याला अडवू शकत नाहीत. मध्यम स्थितीतील बंगाली मनुष्य पुष्कळच बहुश्रुत असतो. त्यांचे स्वतःचे काव्य, नाट्य व इतर वाङ्मय यांच्या परंपरेचा त्यांना मोठा अभिमान असतो. कुटुंबाची खानदानी परंपरा त्यांच्या हाडीमासी खिळलेली असते. कित्येकदा हा खानदानीपणा इतक्या पराकोटीला जातो की दारिद्य, मानहानी इतकेच काय, पण मरणसुद्धा ही माणसे पत्करतात पण आपले उच्च समजले जाणारे आचार-विचार सोडायला तयार नसतात. काही दृष्टीनी बंगाली हिंदुस्थानातील सर्वांत सुसंस्कृत लोक, पण त्यांची संस्कृतीच त्याच्या विकृतीलाही कारण आहे. बंगाली कथा व बंगाली पटकथा यांमध्ये सहृदय, सुशील पण सर्वथैव निष्क्रिय बंगाली पुरुषांचे चित्रण फारच सुंदर कलले आहे. परिणीता, विराज बहू, पथेर पांचाली ह्या विख्यात चित्रपटांतून पुन्हा पुन्हा तेच ते दृश्य दृष्टीस पडते. लाचार, निष्क्रिय, वेळी अवेळी जेवाय पुरता घरी येणारा पुरुष व त्याची वाट पाहात बसणारी, त्याच्या पानावर भरपूर अन्न वाढून स्वतः न जेवणारी, तो जेवताना त्याला पंख्याने पारा घालणारी बंगाली पत्नी हे दृश्य पाहून माझ्या मनात भयंकर घृणा उत्पन्न होते. जवळजवळ तोच प्रकार बंगाली निर्वासितांना पाहून होतो. त्याची भयंकर स्थिती पाहून अतीव करुणा तर वाटतेच पण ‘मरू; पण कलकत्ता किंवा बंगाल सोडणार नाही', ही वृत्ती किंवा स्वतःच्या व कुटुंबाच्या प्राणाचे मोल व्यर्थ देणारी माणसे, किंवा अशांचे दैन्य व लाचारी ह्याचे राजकीय भांडवल करणारे सुसंस्कृत बंगाली पाहिले म्हणजे तितकाच त्वेष वाटतो.
 इकडे पंजाबात अगदी ह्याउलट वृत्ती. पृथ्वी काबीज करायची त्यांची