पान:Bhovara-Iravati Karve.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६८ / भोवरा

मोटर व मोठाले मालट्रक हाकणे व मोटरदुरुस्तीची लहान लहान दुकाने काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. लहान लहान यंत्रे चालवून त्यांवर छोटा छोटा माल तयार करणे व यंत्रांची दुरुस्ती करणे ह्या दोन्ही प्रकारची लहान लहान दुकाने ह्या लोकांनी दिल्लीभोवती शेकडोंनी काढली आहेत. राजपूरला ओस पडलेल्या कित्येक बराकीवजा इमारती मला दिसल्या. राजपूर हे निर्वासितांचे एक मोठे केन्द्र होते. त्यांच्यासाठी या तात्पुरत्या इमारती उभारल्या होत्या. सर्व निर्वासितांची सोय लावल्यामुळे त्या आता मोकळ्या पडल्या आहेत. अगदी मोठमोठ्या कुटुंबांतील बायांनीसुद्धा पडेल ते काम करून कुटुंबे सावरली आणि आज ती मंडळी मार्गाला लागली आहेत.
  याच्या उलट बंगालचा निर्वासितांचा प्रश्न अजून तसाच भिजत पडला आहे. लहानमोठ्या जमीनदारांच्या कुटुंबांची सोय लावली आहे, पण ज्यांना जमिनी वगैरे काही नव्हत्या, असे गरीब निर्वासित हजारोंनी कलकत्त्यात इतर गावागावांतून तळ देऊन आहेत. नुसते बंगालातच नव्हे, तर आसामातही ठिकठिकाणी हे लोक भेटतात. त्यांची याचना व रडगाणे कधीही संपत नाही. आसामी लोक तर या निर्वासितांबद्दल नुसते उदासीनच नव्हे, तर अगदी विटलेले दिसले. कलकत्त्याचे सिआल्डा स्टेशन तर हजार निर्वासितांची राहण्याची एक कायम वस्तीच झाली आहे. पहिल्या प्रथम सिआल्डा स्टेशनवर पाऊल ठेवले की एक भयानक दृश्य डोळ्यांपुढे दिसते. भांडीकुंडी, लक्तरे, डबडी असा संसार भोवती मांडून एकेक कुटुंब वसलेले आहे. कुठे मोलमजुरी करून, भिक्षा मागून जे मिळेल ते पोटात ढकलायचे नि परत स्टेशनवर आपापल्या घरकुलात येऊन बसायचे. हाता-पाया काड्या, खोल गेलेले डोळे, अंगावरची लक्तरे, कधी फणी न फिरवलेले केस अशा बायका, मुले, पुरुष स्टेशनभर पसरलेली आहेत. सर्व स्टेशन एक कुबट दुर्गंधी पसरलेली आहे. या लोकांच्या अंगी काही माणूसपणा असला, तरी तो आता नाहीसा झाल्यासारखा दिसतो. राजकीय पक्षाच्या सत्तास्पर्धेतील, माणसांचा भास निव्वळ ज्याच्यावर राहिला आहे. अशी ही प्यादी. कम्युनिस्टांनी मनावर घेतले व सत्ता बळकावण्यापेक्षा माणसाच्या दुःख निवारणाकडे लक्ष दिले तर निर्वासितांची कोठेही पुनर्वस्ती करता येईल; पण ती तशी करणे अशक्य झाले आहे. अर्थात बंगाली मनुष्य मन:प्रवृत्तीसुद्धा या दैन्याला जबाबदार आहे. मधूनमधून काही थोडा पैसा