पान:Bhovara-Iravati Karve.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभोवरा / १६७

कमी, लोक धिप्पाड, तेजस्वी व अगदी गरिबांतला गरीब शेतकरी हिंवा मेंढपाळ मोठ्या रुबाबात दिसायचा. पायांत तंग विजार, वर चुणीदार अंगरखा आणि डोक्यावर पागोटे किंवा रंगीबेरंगी रुमाल असा पुरुषाच पोषाख. बायका रंगीबेरंगी घागरे घातलेल्या, त्याच्यावर तशीच रंगीबेरंग काचोळी आणि तीनचार हातांची ओढणी अशा पोषाखात असायच्या. बांध्याने उंच, रुंद, ताठ मानेच्या; डोक्यावरून पाण्याचा घडा घेऊन ह्या बायका चालू लागल्या म्हणजे त्यांच्या प्रत्येक अवयवांतून सौंदर्याची व निरोगीपणाची प्रचीती येई. प्रदेश दिसायला ओसाड दिसला तरी अतिशय सुपीक होता. जिथे जिथे म्हणून पाणी मिळे तिथे पीक भरपूर येई. मुख्य खाणे गहू, बाजरी आणि घट्ट उडदाच्या वरणाचा गोळा. ओरिसा व राजस्थान आणि उत्तर गुजरात इथली सृष्टी निराळी; माणसे निराळी, माणसांची राहणी निराळी; खाणेपिणे निराळे. इतका फरक दुसऱ्या दोन विभागांत क्वचितच आढळेल.
 आज ‘दुसरे टोक' हे शब्द माझ्या मनात यायला सृष्टीपेक्षा माणसेच जास्त कारणीभूत झाली. बंगालमधल्या काही खेड्यांची पाहणी करून मी विमानाने दिल्लीला आले होते; नि तिथून आगगाडीने राजपूरला गेले. आणि काही तासांतच, बंगालपासून सर्वस्वी भिन्न अशा ठिकाणी मी वावरत आहे, हे तीव्रतेने मला जाणवले. पंजाबच्या मानाने बंगालचा निर्वासितांचा प्रश्न कितीतरी पटींनी जास्त गुंतागुंतीचा व कितीतरी जास्त व्यापक हे जरी खरे असले, तरी अशा आणीबाणीच्या वेळी वागण्याची तऱ्हा मात्र दोन्ही लोकांची अगदी भिन्न यात शंकाच नाही. पश्चिम पंजाबमध्ये ब्रिटिश सरकारने कालवे काढले आणि त्या कालव्यावर पंजाबी शेतकऱ्यांनी संपन्न शेती उभारली. ती सर्व टाकून त्यांना पूर्व पंजाबात यावे लागले. पण ती शेती त्यांनी सुखासुखी टाकली नाही. तिच्यासाठी त्यांनी रक्त सांडले. हिंदुस्थान सरकार मध्ये पडले नसते; तर पंजाबी कित्येक वर्षे आपल्या | भूमीसाठी लढत राहिले असते. त्यांच्या खेड्यांतून हिंडले, तेव्हा प्रत्येकाने आपले किती लोक गमावले ह्याबरोबरच त्यांचे किती मारले, हेही मोठ्या अभिमानाने सांगितले. सर्वस्वाला मुकून अर्धी अधिक कुटुंबे गायब होऊन जे आले ते कपाळाला हात लावून बसले नाहीत. ते झपाट्याने भारतभर पसरले. कलकत्ता, मुंबई, दिल्ली वगैरे शहरांतून ते हजारोंनी स्थायिक झाले.