पान:Bhovara-Iravati Karve.pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
    १८
   दोन टोके

 दोन टोके म्हणता येतील असे प्रदेश भारतात कितीतरी आहेत. काही वेळा निराळेपणाची जाणीव भौगोलिक परिस्थितीमुळे होते; काही वेळा माणसांच्या निव्वळ बाह्य स्वरूपाने आकारमानाने, रंगाने, कपड्याने होते तर काही वेळा आचारामुळे किंवा विचारामुळे प्रत्ययास येते. ब-याच वेळा ह्या सर्व गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात मिळून जाणवतात. प्रवास करताना मन काही सारा वेळ तोलीत, जोखत बसत नसते. पुढे दिसते, भासते अनुभवास येते ते पाहायचे; त्याचा आस्वाद घ्यायचा आणि तेही हातांतील काम करता करता. पण एखाद्या वेळी कशाने तरी जुन्या आठवणी जाग्या होतात; व सारखेपणाची नाहीतर निराळेपणाची जाणीव होते.
 आसाम आणि कूर्ग-मलबार भारताची दोन टोके. काही दृष्टींनी त्यांच्यात साम्य आहे. दोन्ही जंगली प्रदेश, दोन्ही डोंगराळ, दोन्ही भातखाऊ. जास्तच मौज म्हणजे दोन्ही प्रदेशात काही जमातींची कुटुंबपद्धती मातृप्रधान आहे! मी आसामात गेले तेव्हा भूगोलात वाचलेल्या वर्णनावरून साम्याच्या अपेक्षेनेच; पण प्रत्यक्षात मात्र दर वेळेला फरकच जाणवत गेला. दोन्ही प्रदेशांत रान पण पर्वताची घडण, रानातील वृक्ष, नद्या सर्वच निराळे आहे. मातृप्रधान कुटुंबाची रचनासुद्धा निराळी आहे.
 पण मुख्य फरक जाणवला एका रात्रीच्या प्रवासात-
 आसामात रात्री जंगलातल्या खेड्यात मुक्काम करावा लागेल की काय असे वाटले होते. तसा प्रसंग आला नाही. पण मी त्याबद्दल बोलत असताना एक आसामी माणूस म्हणाला होत, “काय म्हणता? खेड्यात? अहो तिथं हत्ती धुमाकूळ घालताहेत"