पान:Bhovara-Iravati Karve.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६२ / भोवरा

व वर्षभरातच मी खूप हट्ट करून त्यांच्याबरोबर परत हिंदुस्थानात यायला निघाले. आईचे डोळे भरून आले होते, पण ती काहीच बोलली नाही.
 याही गोष्टीला कित्येक वर्षे लोटली होती. आई माझ्या घरात काही दिवस राह्यला आली होती. मुली घरात कशा कंटाळतात, याची कुरकूर मी आईजवळ करीत होते. आई म्हणाली,
 “तू तर घराला कंटाळली होतीस एवढंच नव्हे तर घरातून जायला मिळावं म्हणून देवाला नवस केला होतास.”
 मी आश्चर्याने विचारले,
 काय सांगतेस आई? कधी?"
 तिने जुनी आठवण दिली व मला सांगितले, “तू हिंदुस्थानला परत गेल्याच्या दुसऱ्या दिवशी कृष्णा स्वयंपाक्याने एका वाटीत देवापुढे गूळ घालून ठेवला. त्याला विचारले, तर तो म्हणाला-माईने सांगितले होते की, “कृष्णा, मी जर घर सोडून परत शाळेत जायला निघाले, तर देवाला गूळ ठेव बरं का. माझा नवस आहे." आई किंचित् थांबली. जुन्या जखमा परत वाहावल्या. घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, “माई, त्या वेळी तुला आमचा इतका कंटाळा आला होता, की आमची संगत सुटावी म्हणून तू नवस बोलली होतीस. आता का बरं मुली जरा सुटीच्या बाहेर गेल्या तर कुरकुरतेस?"
 जुन्या स्मृती जाग्या झाल्या, अभावितपणे केवढा क्रूरपणा केला त्याची जाणीव झाली. आयुष्यात काही गोष्टींची भरपायी करताच यायची नाही हे उमजले. आईने मला सांगितले ते खरेच होते. न्यायाचे होते. मुलींच्या बापाने सांगितले तसेच. पण मला न्याय कुठे हवा होता? आई पुढे म्हणाली होती, “हे असंच चालायच-पिढ्यान् पिढ्या असंच चालायचं."
 मला तत्त्वज्ञानही नको होते... न्यायही नको. आता मला माझा एकटेपणा सहन करवत नव्हता. मी वैतागाने पुटपुटले, “असं असेल तर मुलं दहा वर्षांची झाली की आयांनी मरूनच जावं आपलं."
 “ही-ही-खी-खी.... अगदी बरोबर!" माझ्या भोवतालची भुतावळ किंचाळली. मी कानात बोटे घातली.

१९५९