पान:Bhovara-Iravati Karve.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६ / भोवरा

एकमेकांशी बोलतात. नेपाळी भाषा संस्कृतोद्भव, तर भोटिया तिबेटीच्या पोटातली. पोषाखातही खूप फरक असतो. पण त्या पाहुण्यांची वाट नेपाळी लोक वर्षभर चातकासारखी पाहतात!
 उतरायच्या मुक्कामला चट्टी म्हणतात. काही ठिकाणी धर्मशाळा आहेत; पण इतर ठिकाणी चट्टी म्हणजे कोणाच्या तरी मालकीची उघडी पडवी असते. पडवीच्या भिंतीशी चुली असतात. एका बाजूला मालकाचे दुकान असते. उतरायचा नियम असा, की मालकाकडून डाळ, तांदूळ, तेल,तूप, दिवेल, सरपण विकत घेतले पाहिजे. सर्व जिन्नस बरेच महाग असतात.रुपया सवा रुपया शेर तांदूळ, पण तांदूळ बारीक व स्वादिष्ट असतो. तसेच रुपया शेर गव्हाचे पीठ. गव्हाचा रवा मागितला तरी तोच भाव!‘टका शेर खाजा, टका शेर भाजा!’ काय हवे ते घ्या. मसूर व तुरीची डाळ मिळते.मसूर मजुरांचे व गरिबांचे खाणे समजतात. पण तीनचार हजार फुटांपर्यंत चढले म्हणजे तूर शिजत नाही; म्हणून आम्ही मसूरच खात असू. भाजी वगैरे काही मिळत नाही.बटाटे,दूध मिळते.दही दोन ठिकाणीच मिळाले. बरोबर किती घ्यावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो; पण सामानवहातुकीची मजुरी एवढी पडते. की शक्य तो दुकानात विकत घ्यावे असे आम्हांला वाटले.शिवाय जिन्नस विकत घेतले म्हणजे दुकानदारही खुशीने राहण्यास जागा देतो.धनसिंग-वीरसिंग पण रोजचा शिधा विकत घेत, पण त्याच पदार्थांना त्यांना किंमत कमी पडे. आम्हांला रुपया शेर तांदूळ मिळाला तर त्यांना बारा आण्यांना मिळे. दुकानदाराने सांगितले, की "ते मजूर, त्यांना बिचाऱ्यांना एवढा भाव कसा परवडणार? बिचाऱ्यांची मजुरी खाण्यातच संपायची म्हणून त्यांना व तुम्हांला भाव निरनिराळा!" ही व्यापाराची तऱ्हा अगदीच नवी, पण त्यातील तत्त्व आम्हांला मान्य झाले. केदारच्या वाटेवरच्या चट्ट्या स्वच्छ, प्रशस्त व मालक अगत्यशील होते. तर बद्रीवर लोकांना मुळीच अगत्य नाही. वन्संचे जेवण एवढेसे, चंडीप्रसाद व आम्ही दोघेही फार जेवणारे नव्हेत, म्हणून बद्री वाटेवरचे मालक रोज आम्हांला जागा देताना कुरकूर करायचे. "अरे, तुम्ही भाड्याचे पैसे घ्या!" म्हटले तर त्यांना पटत नसे. बरे, एका चट्टीवर जास्त विकत घेतले, तर पुढच्या गावाला रस्त्यावरच निजायची वेळ यायची!
 चट्टीवर आले म्हणजे आज शेजार कोणाचा, म्हणून जरा कुतूहल