पान:Bhovara-Iravati Karve.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

{right|भोवरा / १५९}}

जगाच्या सुरुवातीपासून प्रत्येकीनं शिकस्त केली.
 घरं सजवली, ऊब केली, न्हाऊ घातलं, खाऊ घातलं;
 उंबरठे केले, कवाडं मिटली, कुलपं लावली;
{{gap}तरी एक दिवस सारे दरवाजे उघडून,
 सारे उंबरठे ओलांडून,
 ते निघून जातात.
 आणि सगळ्याजणी, अगदी एकट्या
 आपल्या सजवलेल्या घराच्या पिरामिडमधे
 नाईलच्या हिरव्या पाण्याशेजारी
 जिवंतपणी मरून पडतात."
 मी रागारागाने उठले. पाडगावकरांच्या दरोबस्त सगळ्या जिप्सी, मनात खोल दडलेल्या होत्या त्यांना ओढून बाहेर काढले, त्यांच्या मुंड्या मुरगळल्या, एक खड्डा खणला आणि खरोखर त्यांना अगदी खोल खोल गाडून टाकले.
 घर भरलेले होते. खायच्या वेळी जेवणघरात गर्दी होत होती. किती खायचे केले तरी कधीच संपून जात होतं. नातींच्या रडण्याओरड्याने घर दणाणून जाई; तर त्याच्या आईवडिलांच्या न संपणाऱ्या वादविवादाने डोके दुखू लागे. गेला आठवडा ज्या घरात एक शब्दसुद्धा ऐकू येत नव्हता; तिथे आज निवांतपणे बसायला खोली नाहीशी झाली होती. माझी चिलीपिली माझ्या भोवती भोवती होती.
 दुसरा दिवस धांदलीचा उजाडला. सर्वजण परत गावी जाणार होती. धाकटी पण ताईबरोबर जाणार म्हणाली. बांधबांध चालली होती. मी मदत करीत होते- त्यांच्या धांदलीत, गडबडीत जाण्याचा क्षण जवळ आला आहे हे विसरण्याचा प्रयत्न करीत होते- पण शेवटी तो आलाच.
 “आम्ही जातो हं." जातो हं." जाते हं." सगळीजणे गेली... परत आपले माझे घर अन् मी.
 संध्याकाळी स्वारी आली. आणि मग माझ्या सुजलेल्या डोळ्यांकडे पाहून चौकशी सुरू झाली. चौकशी बारीक आणि त्यावरचा निकाल सरळ न्यायाच्या तराजूने तोललेला.
 “का रडलीस? पोरी मनाला लागेल असं काही बोलल्या का?”