पान:Bhovara-Iravati Karve.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १५७

कामाख्येचे देऊळ ज्या टेकडीवर आहे ती लागली. मोटर हाकणारा म्हणाला, “बाई, जायला रस्ता सध्या मोकळा आहे. आपल्याला दर्शन घेऊन येण्यापुरता वेळ आहे. वर जाऊन दर्शन घ्या."
 आम्ही निघालो. देवीचे देऊळ बंगाली थाटावर बांधलेले आहे. रोज रेडा बळी देतात. त्याचे मास प्रसाद म्हणून खायला मिळते. मला तो प्रसाद नको होता, म्हणून मी एकदम देवळातच गेले. देवळात खोल खोल अर्धवट अंधारातून देवीच्या दर्शनास जावे लागते. शिरस्त्याप्रमाणे पूजामंत्र म्हणायच्या आधी पुजाऱ्याने म्हटले, “बाई, काय इच्छा असेल ती सांगा" मनात हजारो गोष्टी गर्दी करून आल्या. स्वतःसाठी देवीजवळ काही मागायचे का आसामच्या एकतेसाठी प्रार्थना करायची? सगळ्याच गोष्टी क्षुद्र वाटल्या. जे काय चालले आहे ते काय त्या जगन्मातेला माहीत नाही, असे थोडेच आहे? मी म्हटले, “बाबा, माझी काऽही इच्छा नाही” तो म्हणाला, “खरंच नाही?" मी पुन्हा निक्षून सांगितले, “खरंच नाही." त्याने मला देवीच्या पायांवर डोके टेकायला सांगितले व मंत्र म्हटला... “हे। जगन्माते, या तुझ्या मुलीला जन्म, जरा व मृत्यू यांपासून सोडव. तिला मुक्ती दे.' सकाळी प्रवासी बंगल्यात बसल्या-बसल्या रिकामपणाचा चाळा म्हणून मी देवीसाठी एक प्रार्थना रचली होती. देवीच्या पायावर डोके टेकून मनातल्या मनात मी ती म्हटली :
 राजराजेश्वरी, कामरूपधारिणी । करुणामयी, विश्वजननी
 पादकमलपतितायाम् । दुहितरी कृपां कुरु। दया कुरु ।।

१९५९