पान:Bhovara-Iravati Karve.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १५६ / भोवरा

 हे अफाट गाणे ऐकून व त्यांतून प्रतीत होणारी गारो लोकांची संस्कृती पाहून माझे मन थक्क झाले. ह्या संस्कृतीच्या संरक्षणाच्या नावाने गारो लोकांत आसामी लोकांबद्दल द्वेष पसरविला जात आहे. वन्य प्रदेशांतील अंमलदारही होता होईतो आसामी नसलेले असे असतात. ते या हुच्चपणाला प्रोत्साहन देतात. हिंदी शिकणे व दिल्लीहून आलेल्या बड्या लोकांपुढे ‘जनमनगण' म्हणून दाखवणे आणि आपल्या लोकनृत्यांचे प्रदर्शन करणे हा सर्व टेकड्यांवरील प्रदेशांतून ठराविक कार्यक्रम होऊन बसला आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रेचे खोरे, खासी टेकड्या, गारो टेकड्या, लुशाई टेकड्या आणि इतर काही विभाग असे निरनिराळे विभाग पडलेले आहेत. प्रत्येक जण आपल्याला दुसऱ्यापासून वेगळा समजतो आणि ह्या वेगवेगळेपणाच्या जाणिवेची जोपासना मिशनरी, परकीय समाजशास्त्रज्ञ व अधिकारी वर्ग मोठ्या कसोशीने करीत आहे. महाराष्ट्र गुजरातपासून वेगळा होऊ पाहू लागला तर तो देशद्रोह होतो; पण ज्यांना भाषेत काडीचेही लिखित वाङ्मय नाही; ज्यांचे हल्लीचे जीवन परकीय मिशनऱ्यांनी घडवलेले आहे, अशा या चिमुकल्या वन्य जमातीच्या संस्कृतीचे मात्र दिल्लीकडून मोठ्या कटाक्षाने संरक्षण केले जाते. तीन कोटींचा महाराष्ट्र वेगळा झाला तर जणू हिंदुस्थान रसातळाला जाईल अशी भाषा बोलणारे लोक पूर्व सरहद्दीवर असलेल्या या चिमुकल्या आसामचे तुकडे तुकडे करीत आहेत हे पाहून विलक्षण आश्चर्य व उद्वेग वाटला.
 तुडा सोडण्याच्या आधी कलेक्टरकडे गेले होते. तो म्हणत होता, गेल्या काही वर्षांत तुडा गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आसपासच्या गावातूनही पाण्याची हाकाटी आहे. डोंगरमाथ्यावरचे जंगल जाळले की पाण्याचे दुर्भिक्ष्य होणारच ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. वन्य लोकांना डोंगरमाथा निर्वृक्ष करू नये, म्हणून म्हैसूर, गोदावरीचा प्रदेश, ओरिसा, वगैरे ठिकाणी जंगल खात्याचे भगीरथ प्रयत्न चालू असतात. येथे पाहते तो दरवर्षी राजरोसपणे सुंदर सुंदर जंगले नष्ट होत आहेत. दुसऱ्या दिवशी दिवसा-उजेडी तुडाहून निघाल्यावर सर्वत्र जळलेल्या, उघड्या बोडक्या डोंगरांचे जे दृश्य दिसले ते रात्री दिसलेल्या आगीपेक्षाही भयानक वाटले.
 धो...धो... पडत्या पावसात गोहत्तीला पोचलो. दुसऱ्या दिवशी कलकत्त्याला जायचे विमान गाठायचे होते. विमानतळावर जाताना