पान:Bhovara-Iravati Karve.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४ / भोवरा

थोडी वाट गेल्यावर पाहते तो लांब डोंगरावर आगीचा डोंब उसळला होता. अवतीभवती पाहिले तर कित्येक टेकड्यांना आगी लागलेल्या दिसल्या. रान जळताना पाहिले की माझी जीव घाबराघुबरा होतो. कूर्गमध्ये अरण्यात कुठे इतकासा धूर निघाला की सारे जंगलखाते धावत सुटायचे आणि तेथे पाहते तो जिकडे तिकडे आगी लागल्या असून काहीच हालचाल दिसत नव्हती. माझा मोटरहाक्यासुद्धा जणू काही झालेच नाही, इतक्या शांतपणे मोटर हाकीत होता.
 मी त्याला म्हटले, “अरे रानाला आग लागली आहे!" तशी तो मला म्हणतो, “बाई, ही आग लागलेली नाही. भातशेती करण्यासाठी दरवर्षी गारो लोक असेच जंगल जाळीत असतात.
 आम्ही जसजसे तुडाच्या जवळ यायला लागलो तसतसा आगीचा भयानकपणा वाढूच लागला. माझ्या नजरेसमोर मोठमोठे वृक्ष धाडधाड पेटून कडाकड पडत होते. आणि माझा मोटरवाला म्हणतो, “बाई, गेल्या वर्षी एक झाड मोटरीवर पडलं होत.”
 संध्याकाळच्या रम्य वेळी कुजबुजणाऱ्या झाडांच्या थंड हवेतून प्रवास करीत, आज काय बरे जनावर दिसेल, अशा विचारात मी जी होते ते हे विचित्र अनपेक्षित, रौद्र-भयानक दृश्य मात्र मला दिसले. त्या पेटत्या जंगलातून प्रवास करीत आम्ही कसेबसे तुडाला येऊन पोहोचलो. तेथे मात्र जवळपास कुठे आग दिसली नाही. प्रवासी बंगला एका टेकडीच्या माथ्यावर उंच बांधलेला होता. हवाही थंड व आल्हाददायक होती. आमची वाट पाहून लोक निघून गेल्याने खायचीही अडचण झाली. झोपेतसुद्धा मला त्या पेटत्या रानाचे चित्र दिसत होते.
 दुसया दिवशी कलेक्टर येऊन मला समाजकल्याण केंद्रावर घेऊन गेला. त्या दिवशी तुडाचा बाजार होता. आसपासच्या २०-२५ गावचे लोक जमले होते. स्त्रीपुरुषांचे बसके, मोंगल घाटाचे चेहरे, रंगीबेरंगी वस्त्रे व डोक्याला बांधलेल्या नाना तऱ्हेच्या रिबिनी यामुळे बाजार मोठा मनोहर दिसत होता. बाजाराचा दिवस असल्याने कोठच्याही केंद्रावरती ग्रामसेविका सापडणे कठीणच होते. म्हणून एका नवीन निघालेल्या केंद्राची पाहणी करून बाजारात परत आलो. आमच्या सुदैवाने २-३ गावच्या ग्रामसेविका बाजारातच भेटल्या. त्यांना मोटरीत घातले व त्यांचे गाव